मौन
जन्मतः बालक आवाज काढते.पुढे संस्काराने
त्याचे भाषेत रुपांतर होते. नंतर त्यातील भावना
त्यास उमगतात.पुढे तो विचारपूर्वक बोलू लागतो
आणि शेवटी त्यास गप्प बसण्याचे किंवा मौन
बाळगण्याची समज येते.
कधी बोलावे ह्याच्या इतकेच महत्त्व कधी गप्प
बसावे यास आहे. हे संतुलन साधणे शहाणपणाचे
असते. शहाण्या माणसाचे मौन फार बोलके असते. जे बोलण्याने साध्य होत नाही ते मौन
बाळगल्याने होत असते.परंतु तो विवेक असावयास हवा.
बोलण्यातून खरे खोटे प्रगट होते. चाणाक्ष लोक
प्रसंग बघून मौन बाळगतात. अनेकवेळा मौन
बाळगल्याने वाद टळतात. कधीतरी मौनामुळे
तंटे वाढतात. मौन हे तणावाचे नसावे.रूसलेली,
नाराज असलेली,रागात असलेली किंवा मानसिक रोगी जेव्हा मौनात असतात तेव्हा आतून ती धुमसत असतात. धुमसते मौन हे
स्फोटक असते. एखाद्यास धाक दाखवून गप्प
बसवणे हे मौन ठरत नाही. मनाच्या शांतीतून
येते ते मौन.सहनशील माणसे मौन बाळगतात.
लाचार मौन बाळगतात. मला माहित नाही, मी
बघितले नाही एवढे बोलून स्वतः ची सूटका करुन
घेतात.
कुणी लाजते म्हणून गप्प बसते. मोठ्यासमोर
आपण कसे बोलावे म्हणून कुणी गप्प बसते. आपले कोण ऐकते म्हणून कुढत गप्प बसणारे
असतात. खरे कोण ऐकणार म्हणत कुणी मौन
बाळगतात. बोलण्याने आपले बिंग फुटेल म्हणून
गप्प असतात. आपल्याला काय करायचे,या तटस्थपणामुळेही कुणी गप्प राहते.
बोलण्याने आपले महत्त्व कमी होते, असे समजून
काही गप्प राहतात. वाचाळता नको ,या विचाराने
काही गप्प असतात. काहींना काय बोलावे सुचत
नाही यासाठी गप्प असतात. आपले अज्ञान उघड होऊ नये यासाठी कुणी मौन बाळगते.
साधुसंतासाठी तो योग असतो.भोंदूगिरीचे ते
हत्यार असते. लाचाराची ती नम्रता असते. कारस्थानीसाठी ती कुटनीति असते. मौनाचा
उपयोग कोण कसा करतो यावर त्याचा प्रकार
अवलंबून आहे. सरसकट सगळे मौन,मौन
नसते.
ना.रा.खराद
