आजच्या राजकारणात कोणतीही गोष्ट धर्माला नेऊन जोडणे ही एक विकृती तयार झाली आहे.
अशा धर्माच्या अनुयायांची संख्या वाढण्यामागे दोन महत्वाचे विचार असतात...
" तुम्ही सुरक्षित नाही आहात "
आणि
" तुम्ही नीट जगू शकत नाही आहात " असे विचार जेव्हा एखाद्याच्या डोक्यात वारंवार रुजविले जातात तेव्हा ती व्यक्ती भीतीखाली वावरु लागते. आणि मग तिला धर्म हाच एक आधार वाटू लागतो. याच जन्मात नव्हे तर, मृत्युनंतर देखील उत्कृष्ट जीवन जगण्याची हमी धर्म देतो ! जर कोणी प्रश्न विचारला नाही तर हा धर्म अत्यंत आश्वासक असे वातावरण तयार करतो. मग ते प्रवचन असो, प्रार्थना असो, वा कर्मकांडांची मालिका असो.
असा धर्म लहान मुलांसाठी मात्र एक आपत्ती बनतो. कारण त्यांची कोणत्याही प्रश्नाविषयीची उत्सुकता मारून टाकली जाते. स्वतंत्र विचार करायचा नाही असा विचार रुजवला जातो. गुरु आणि धर्म जे सांगेल तेच अंतिम स्वीकारायचे असे मनात रुजवले जाते. एवढेच नव्हे तर स्वतःच्या भावनांना देखील बाजूला ठेवा आणि धर्म सांगतो त्याप्रमाणेच भावना व्यक्त करा असे वारंवार रुजवले जाते.
सत्य शोधणे हे स्वतंत्र विचारांतून जन्माला येते. पण आम्ही सांगू तेच अंतिम सत्य होय असे ठासुन सांगितले जाते. धर्मग्रंथ, धर्मगुरू आणि संस्कृती हेच सत्य जाणणारे आणि मांडणारे आहेत, म्हणून त्यांचेच फक्त ऐकावे असे ठसविले जाते.
' आज्ञा पाळणे ' हे सर्वोच्च मूल्य आहे असे शिकविले जाते. त्यातून धर्मगुरुची आज्ञा, देवाची आज्ञा, धर्मग्रंथाची आज्ञा, संस्कृतीच्या आज्ञा, अशा आज्ञांच्या ओझ्याखाली भक्त आयुष्यभर राहतो. यातून मूलतत्ववादी किंवा माझेच खरे व माझाच धर्म अंतिम अशी हेकेखोर वृत्ती जन्म घेते. कारण, माझ्या धर्माशिवाय अंतिम सत्य कोणतेही नाही असा हटवादी विचार मनात कायमचा कोरला गेलेला असतो. थोडक्यात सर्व धर्म हे भक्तांवर मानसिक नियंत्रण अखंड ठेवून त्यांना मानसिक विकृतीकडे घेऊन जात असतात.
भीती हे सर्व धर्मांचे प्रभावी शस्त्र बनते. ज्या योगे ते भक्तांना मानसिक गुलाम बनवतात. मनुष्यत्व हे क्षणभंगुर असून देव आणि धर्म हेच अमरत्वाकडे घेऊन जातात अशी शिकवण म्हणजे सर्वात मोठा भ्रम होय. एक गंभीर आणि अत्यंत वाईट समजूत अशी रुजवली जाते की, जे जे आपल्या धर्मास, संप्रदायास, संस्कृतीस, मानणारे नाहीत ते ते शैतान असून त्यांचा विनाश करणे हे धर्मकृत्य होय. लहानपणीच हे असले विकृत तत्त्वज्ञान डोक्यात बसल्यावर ती व्यक्ती आयुष्यभर याच विचारांच्या पिंजर्यात गुलाम बनून राहते. या गुलामीलाच ती धर्म समजते.
धर्माच्या कचाट्यात सापडलेली व्यक्ती जर या विकृत विचारातून बाहेर पडण्याचा विचार करू लागली तर प्रत्येक धर्माचा एक धाक असतो आणि तो धाक म्हणजे नरकात जाऊन नरक यातना भोगशील या संदेशाचा !
वास्तवात स्वर्ग आणि नरक या भ्रामक कल्पना आहेत. पण असा भ्रम भक्तांमध्ये निर्माण करण्यात धर्म यशस्वी होतो. थोडक्यात हा एक भावनिक आणि मानसिक दहशतवाद ठरतो.
जगात सर्वत्र राक्षसीपणा आहे आणि देव या सर्वांपासून मुक्ती देतो-करतो ही भ्रामक संकल्पना धर्म रक्षणासाठीचे हत्यार बनते. आणि स्वतःच्या रक्षणासाठीचा मंत्रही बनतो. दैत्य, राक्षस, पापी लोक, इत्यादी अनेक संकल्पना उभ्या करून लोकांच्या मनात भीती सातत्याने उभी करण्याचे काम धर्म अव्याहतपणे करत असतो. या भीतीवर उतारा म्हणून विविध पूजा-प्रार्थना-कर्मकांडे उपाय म्हणून धर्म सुचवतो. आणि त्यासाठी तशी माणसे नेमतो. जी धर्मगुरू किंवा पुजारी-पुरोहित असतात.
सर्वशक्तिमान अशा देवासमोर आणि धर्मगुरू-महाराज-सद्गुरूंसमोर नतमस्तक होणे म्हणजेच खरा धार्मिक होय अशी शिकवण पण दिली जाते. यातून, सारासार बुद्धिमत्तेचा आणि स्वतंत्र विचार करणाऱ्या विवेकी वृत्तीचा सर्वनाश होतो. शहाणा तर्क करण्यास सोडचिठ्ठी मिळते. निर्णय घेण्याची क्षमता ढासळते. मनात येणार साऱ्या भावना दबल्या जातात.
जर आपली मते दुसऱ्यांवर लादणे हा मानसिक अत्याचार मानला तर लहान मुलांवर धार्मिक संस्कार त्यांच्या नकळत करणे हा फार मोठा गुन्हा झाला. भ्रमांच्या जगात वावरणाऱ्या या धर्म टोळ्या असे गुन्हे करून नवीन टोळ्या तयार करीत आल्या आहेत, यालाच परंपरा असे गोंडस नाव आहे. दुसऱ्यांच्या मनांवर नियंत्रण ठेवणे आणि भावनांचा वापर करणे हे देखील गुन्हेगारी कृत्य आहे. पण धर्मात किंवा संस्कृतीत यालाच प्रतिष्ठा आहे. कारण धर्मगुरू जेव्हा एखादा कोणताही नियम करतात तेव्हा तो अविवेकी जरी असला तरी तो प्रतिष्ठित होतो. जात व्यवस्था हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. अशा धर्मगुरूस बहुसंख्येने मानल्या जाणाऱ्या धर्मास सोडचिठ्ठी देणे अतिशय अवघड काम मानसिकदृष्ट्या बनते. वर्षानुवर्षांच्या परंपरा आजूबाजूला धार्मिक वातावरण आणि बालपणापासून स्वीकारलेले संस्कार हे सारे तोडून बाहेर पडायचे ठरवले तर निश्चितपणे डिप्रेशन येते. जर असे लक्षात आले की धर्मसंस्कार आणि संस्कृतीच्या परंपरा या भ्रामक पायांवर उभ्या आहेत तर त्या सोडण्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागतो. मुळातच धर्माने अगोदरच मानसिकता कमकुवत आणि परावलंबी करून ठेवलेली असते. त्यात सर्वात मोठी भर असते भीतीची. ही भीती स्वसंरक्षणार्थ आक्रमक बनते. तीला धर्मप्रेरणा असे गोंडस नाव आहे. धर्मवीर असा मिथ्या गौरव आहे. ही भीती-हा घाबरटपणा आणि दुराभिमान धर्म सोडण्यास नकार देतो. आणि पुन्हा धर्माच्या चक्रात पिसला जातो.
जगभरात आज अनेकांना धर्माच्या भ्रामक कल्पनांमधून बाहेर पडायचे आहे. परंतु त्याच वेळी त्यांना एका मानसिक त्रासाला तोंड द्यावे लागते. या मानसिक त्रासाची लक्षणे ही गंभीर ताण निर्माण झाल्यावर जी विकृती तयार होते त्याच्याशी मिळतीजुळती असतात. ज्याला पोस्ट ट्रुमाटिक स्ट्रेस डिसॅर्डर असे म्हणतात. अशावेळी भयंकर काहीतरी घडेल अशा भावना निर्माण होतात. प्रचंड असहाय्यता निर्माण होते. आपण दहशतीखाली आहोत असे वाटू लागते. छळणारे विचार वाढू लागतात. नकारात्मक भावना तयार होतात. समाजात वावरताना दोष निर्माण होतात. वास्तवात अशी लक्षणे ही धर्माची घातक विषारी शिकवण आणि कर्मकांड यातून निर्माण होतात. ज्यामुळे मानसिक आघात होऊन मोठी हानी झालेली असते. त्यातही जर एखाद्या बुवा-महाराजाने लैंगिक अत्याचार केलेले असतील किंवा फसवले असेल तर मानसिकता पार बिघडून जाते. आपला सामाजिक आधार अचानकपणे नाहीसा होईल ही भीती धर्म सोडून न देण्यास सतत हातभार लावत राहते. धार्मिक समुदायाने लोकशाही व्यवस्थेची निंदानालस्ती करून भीती घालून ठेवल्याने आपण धर्म सोडल्यावर लोकशाही व्यवस्थेत जगू की नाही याची साशंकता निर्माण होते. खरेतर स्वतःची जगण्यासाठीची आवश्यक कौशल्ये, आत्मविश्वास निर्माण होतील अशी मानसिकता आणि स्वतंत्र विचार करण्याची वृत्ती जर अशा व्यक्तींमध्ये नसेल तर अशा व्यक्ती सहजपणे धार्मिक संस्कारांच्या इजा तशाच जवळ बाळगून जगत राहते.
मनोविज्ञानात ही लक्षणे आता फार महत्त्वाची मानली जाऊ लागली आहेत. कारण अशा खचल्या गेलेल्या आणि धर्म सोडू इच्छिणाऱ्या व्यक्तींमध्ये ही लक्षणे मोठ्या प्रमाणावर दिसून येऊ लागली आहेत. विचारांचा गोंधळ, निर्णय घेण्याची अक्षमता, स्वतः बद्दल विचार करण्यात अडचणी, आयुष्याची दिशा कोणती घ्यावी याचा अभाव, जगामध्ये वावरण्याची चिंता, निराशा विकृती, प्रचंड राग, कडवटपणा, स्वतःला दोष देणे, भावना व्यक्त करू न शकणे, जेवणाच्या व झोपेच्या तक्रारी, रात्रीची भीती, अचूक आदर्शवादी हट्ट, शरीराबद्दल नकारात्मक दृष्टिकोन, स्वतःवर नियंत्रण न ठेवता येणे, वर्तमान जगात वावरता न येणे, एकटेपणा, विस्कळीत झालेले कुटुंब, अशी अनेक लक्षणे सध्या अशा व्यक्तींमध्ये दिसून येत आहेत. या व्यक्ती कडेकोट धार्मिक बंधनात वाढलेल्या असतात. अतिसुरक्षित वातावरणात बांधून ठेवलेल्या असतात. प्रामाणिकपणे आणि वैयक्तिक निर्णय घेऊन धर्मात पूर्णपणे झोकून दिलेल्या असतात आणि धर्माच्या कह्यात सदासर्वकाळ असतात.
एकट्या अमेरिकेत दहा वर्षापूर्वी केलेल्या सर्वेक्षणात असे आढळले आहे की, 'कोणत्याही धर्माचे नाही' असे म्हणणाऱ्यांची संख्या १९९० ते २००८ च्या दरम्यान दुप्पट होऊन जवळपास १९ दशलक्ष व्यक्तींपर्यंत येऊन ठेपली होती. विशेष करून बाप्टिस्ट, कॅथोलिक आणि प्रॉटेस्टंट या सर्व पंथातले लोक होते. जगभरात जवळपास ४५० ते ५०० दशलक्ष लोक आज धर्म न मानणारे आहेत. ख्रिश्चन आणि मुस्लिम यांच्यानंतर तिसऱ्या नंबरवर आता धर्म न मानणारे लोक येतात.
धर्म आता मानसिक रोग निर्माण करणारा स्त्रोत बनू पहात आहे. किंबहुना दहशतवाद, मूलतत्ववाद ही धर्माची अपत्ये आहेत, ज्यांना आपण आज उघडपणे विकृत मानसिकतेचे समजतो. पण धार्मिक शिकवण ही नैतिकतेकडे घेऊन जाते असे कोणी म्हणेल तर जगात धर्म उन्मादामुळे आज बहुसंख्य समस्या आणि दहशतवाद निर्माण झालेल्या आहेत हे लपवून ठेवले जाते. एवढेच नव्हे तर परधर्मद्वेष आणि परधर्ममत्सर नावाचा मानसिक विकार प्रत्येक धर्माभिमानी बाळगत असतो. अशा या धर्मामुळे निर्माण होणाऱ्या बिघडलेल्या मानसिकतेला 'रिलीजियस ट्रोमा सिंड्रोम' या नावाखाली ओळखले जाऊ लागले आहे. मानसिक रोगाच्या यादीत कदाचित काही काळानंतर हा रोग समाविष्ट देखील होऊ शकेल.
आज मात्र आपणास विचार करावा लागेल की नीतीने आणि विवेकाने वागण्यासाठी धर्माची गरज नाही. त्यासाठी वैज्ञानिक दृष्टीकोन आणि विवेक स्वेच्छेने बाळगला तरी पुरे.
आणि हे ज्यांना जमणार नाही त्यांना मानसोपचाराची गरज आहे असे समजावे.
- डाॅ. प्रदीप पाटील
