धूंद व्हावे असे.....!
स्वर्ग असेल की नाही मला माहीत नाही, परंतु आपण जिथे आहोत तो ग्रह काल्पनिक स्वर्गापेक्षा देखील सुंदर आहे.कुणा दूसऱ्या ग्रहांवर जाण्याचे कुतुहल वाटण्या अगोदर पृथ्वी या ग्रहावर आपण प्रथम आलेलो आहोत,त्याचे आश्चर्य वाटायला हवे.
सृष्टीचे सौंदर्य आपण न्याहाळत नाही,हा आपला करंटेपणा आहे.आपल्याशिवाय आपल्या अवतीभोवतीचे जग किती विलक्षण आहे याविषयी आपण अनभिज्ञ आहोत.क्षणाक्षणाला बदलणारे सृष्टीचे सौंदर्य मनाला भुरळ घालते.
विविध प्राणी,पक्षी ,वृक्ष,वेली यांचे विश्व न्याहाळता आले पाहिजे.सृष्टीने विविध रंगांची जणू उधळण केली आहे.
एकीकडे महाकाय प्राणी,तर दुसरीकडे सुक्ष्म जीव.एकीकडे गगनचुंबी वृक्ष तर कुठे लहानसे रोपटे.
उंच भरारी घेणारे पक्ष्यांचे थवे तर जमीनीवर रेंगाळणारी कीडे आपली करमणूक करतात.
समुद्र, नद्या,झरे हे जलस्रोत आपली तहान तर भागवतात, कानांवर मंजूळ स्वर देखील टाकतात.
माशांच्या प्रजाती मनसोक्तपणे विहरत असतात.विविध
जिवांचा चाललेला लपंडाव बघितला की मन मोहून जाते.
झाडाच्या बुंध्याशी खेळणारी खारुताई,मान उंचावून बघणारा सरडा,टपलेला कावळा बघितला की जगण्याची
उर्मी वाढते.
सारखे बदलणारे आकाशाचे रुप भान हरपून जाते.ऋतूनुसार पालटणारे सृष्टीचे सौंदर्य वेड लावते.
थंड वाऱ्याची झुळूक मन प्रसन्न करते.विविध रंग आणि
आकारांची फुले तर नसानसात उत्साह भरतात.
सूर्याचे प्रखर तेज, 🌙 चंद्राचा सौम्य प्रकाश डोळ्यांचे पारणे फेडतो.त्यामध्ये लुकलुकणारे तारे तर चार चांद लावतात.सृष्टीचे हे डेकोरेशन आश्चर्यकारक आहे.
डौलाने चालणारे पक्षी, सरपटणारे जीव कलेचा उत्तम नमुना वाटतात.या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारणारी 🐒 माकडे, किती मजेदार वाटतात.
सृष्टीचे वैभव न्याहाळत जगले पाहिजे.बेधूंद होता आले पाहिजे.
माणसांच्या विश्वातून थोडे बाहेर पडले पाहिजे, आपल्याच विश्वात रमले पाहिजे.
- ना.रा.खराद,अंबड
