रुमाल
- ना.रा.खराद
आपल्या कायम सोबतीला असलेला रुमाल फारच मोलाचा आहे.जवळ रुमाल नसलेला मनुष्य फार मागास वाटतो, तुच्छ समजला जातो.रुमाल हा नेमका कोणत्या कामाचा आहे,हे सांगणे देखील कठीण आहे कारण तो
बहुपयोगी आहे.जवळ बाळगायला सोपा.खरेदीला स्वस्त.
रुमालाचा वापर कोण कशासाठी करेल सांगता येत नाही.
गरजेच्या वेळी प्रथम आठवतो तो रुमाल.आकाराने लहान मोठे, विविध रंगांचे रुमाल उपलब्ध आहेत.आवडी
आणि गरजेनुसार त्याची निवड होते.रुमाल देखील लिंगभेद करतात.लेडिज रुमाल जो आकाराने लहान, नाजूक स्त्रीसुलभ असतो.तो तितकाच हळूवार हाताळला जातो.प्रथम भेटीची आठवण म्हणून कित्येक रुमाल
धन्य पावले आहेत.एकमेकांचे रुमाल जवळ
बाळगणे हे प्रेमीयुगुलांच्या सोयीचे असते.रुमालाचा सर्वांत जास्त संपर्क नाकाशी येतो.नाकाचे आणि ओठांचे अंतर फार कमी, अशावेळी रुमाल धाव घेतो आणि नको असलेला ओघ थांबवतो.अनेकांचे अश्रूं पुसणारे कुणी नसते अशावेळी रुमालच हळहळतो आणि आपले अश्रू पुसतो.
दादा लोक रुमाल गळ्याभोवती बांधतात,त्याने
दादापणाचा एक वेगळा लूक तयार होतो.राजकीय पक्षांनी देखील रुमालाचे महात्म्य ताडले आहे.सर्वच पक्षांनी आपले रुमाल प्रचारातआणले.रुमालाचे आकार आणि प्रकार शेंकडोंआहेत.रुमालाच्या वापरावरुन देखील ओळख पटते.यू.पी., बिहारी लोकांची ओळख रुमालाने पटते.
विशिष्ट धर्माचे लोक वैशिष्ट्यपूर्ण रुमाल वापरतात.रुमाल हे कट्टरपंथी लोकांचे प्रतिक आहे.लग्नात वधू वरांचे रुमाल असतात.वधूची पहिली गाठ रुमालाशी पडते.भाजीपाला,फळे यांचे वहन करण्याचे काम देखील रुमाल करतो.ऐनवेळी आपली गरज भागवितो तो रुमालच.कपड्यावरची धूळ झटकण्याचे काम तो करतो.तोंडावरुन फिरवला की बरे वाटते.कुठे जमीनीवर अंथरुन त्यावर आपण आसनस्थ होतो.कधी डोक्याखाली , उन्हात डोक्यावर, पावसाळ्यात
ओले अंग कोरडे करतो.तोंड लपवण्यासाठी देखील रुमालाचा उपयोग होतो.
रुमालाचा झोळी म्हणून उपयोग करता येतो.
डोके दुखु लागले की रुमाल डोक्याला बांधला
जातो.हाड मोडले,रक्त वाहू लागले की रुमाल
मदतीला येतो.इतकेच नाही चपलेचा अंगठा तुटला किंवा बूट रुतू लागला की रुमाल कामी येतो.कुणी काही दिले की रुमालात ते घेता येते.स्वागत सत्कार रुमालाने केले जातात.बसमध्ये जागा धरण्यासाठी रुमालाचा जास्त वापर होतो.उन्हात,पावसात, थंडीमध्ये तो उपयोगी पडतो.कमरेभोवती गुंडाळता येतो.उशाला घेता येतो.
रुमाल आपल्या अत्यंत उपयोगाची वस्तू आहे,
सर्वांनी तो जवळ बाळगला पाहिजे, त्याच्याविषयी कृतज्ञ
असावयास पाहिजे.
