पुस्तकाचे नाव:*सावित्रीमाई फुले आणि बेईमान लेखण्या*
लेखिका:डॉ प्रतिभा अहिरे.
प्रकाशक: वैजनाथ वाघमारे,
साद प्रकाशन,औरंगाबाद.
आवृत्ती जून२०१३,पृष्ठे ८०,मूल्य ६०.
सदरील पुस्तक हे सावित्रीमाई फुलेंच्या कार्याचा रचनात्मक दृष्टिकोनातून केलेल्या पायभरणीचे दर्शन घडवते.सावित्रीमाई यांच्या अथक परिश्रम,त्यांचा त्याग,समर्पण आणि बलिदान यामुळे समस्त महिलांच्या आयुष्यात परिवर्तन घडले. त्यांची मरणप्राय वेदना देणाऱ्या बंदिगृहातील साखळदंडातून पूर्णपणे मुक्तता करण्यात सावित्रीमाई यांचा सिंहीणीचा वाटा आहे,हे सत्य आहेच! लेखिकेने समीक्षक दृष्टीने विविध पैलूंवर प्रहार करीत सत्य समोर आणले आहे.या पुस्तकाचे मुखपृष्ठ प्रसिद्ध चित्रकार राजानंद सुरडकर यांनी रेखाटले आहे.जे पुस्तकांसाठी अगदी सुयोग्य आहे.
मनोगतात शेवटच्या परिच्छेदात...
"जेव्हा स्त्री-शूद्रातिशूद्र, बहुजन शिक्षित होईल तेव्हा धर्मग्रंथात आपल्या विरोधात असलेले कुभांड वाचून त्या धर्मग्रंथाच्या रेवड्या रेवड्या उडवल्याशिवाय, या आर्य ग्रंथांना आगीमध्ये जाळल्याशिवाय तो रहाणार नाही. "माणुसकीने आणि मानवी प्रतिष्ठेने हे जग सर्वांग सुंदर करू पहाणाऱ्या क्रांतिनायकांचे तत्त्वज्ञान कलुषित करण्याचे काम आजही नेटाने सुरू आहे.
त्यांचा इतिहास पुसून टाकण्याचे धाडस परिवर्तनवादी चळवळीला आव्हान देत उभे आहे. प्रतिगामी प्रवाहाला नितळ, स्वच्छ, सुंदर मानवतावादी तत्त्वज्ञानाचा तिरस्कार आहे. चवदार तळ्यात शेण, गोमुत्र, विष्ठा टाकून ते प्रदुषित करणारा हा प्रवाह आहे. विचारांच्या पातळीवर याच प्रकारची अपप्रवृत्ती प्रदुषण फैलावत आहेत. त्यासाठी सातत्याने विपरित वाचन करत 'दक्ष' राहून जागल्याच्या भूमिकेतून हे प्रदुषण रोखले पाहिजे. सावित्रीमाई आणि जोतिबा फुले यांचे कार्यकर्तृत्व नाकारणाऱ्या मनोवृत्तींना आत्मशोध घेण्यास बाध्य करावे, यासाठी हा लेखन प्रपंच हाती घेतला आहे. चिकित्सक वाचक या प्रयत्नाचे स्वागत करतील, ही अपेक्षा.
---- *डॉ. प्रतिभा अहिरे*
निश्चितच सर्व भाऊ बहिणी यांना यातून नवे यथार्थ आकलन होते की, आपल्याला माणूस करणारे महानायक, प्रेरणा स्त्रोत सावित्रीमाई आणि जोतिबा हेच आहेत! त्यामुळे त्यांच्याप्रति कृज्ञता बाळगणे आपले कर्तव्य आहे. त्यांना नाकारणारे पुढे येत असतील व आपण केवळ बघे राहू तर हा कृतघ्नपणा होईल,असे वाचक अभ्यासक म्हणून मला वाटते.
सदर लेखात पुस्तकातील निवडक उतारे/ओळी घेतल्या आहेत..
महाराष्ट्राच्या सामाजिक प्रबोधनाच्या परंपरेला समृद्ध करणार्यांमध्ये आद्यशिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीमाई फुल्यांचा वाटा सिंहीणीचा आहे. मात्र याचे श्रेयदेखिल त्यांना नाकारण्याचे प्रयत्न तथाकथित लेखक,विचारवंतांकडून शिस्तबध्दपणे सुरू आहेत. जोतिबांचे क्रांतीकार्य नाकारण्याचे, त्यांना बदनाम करण्याचे तत्कालात प्रयत्न झाले,
अद्यापही सुरूच आहेत...
.....अर्थात ही प्रवृत्ती केवळ मनुवादी पुरुषांमध्ये नव्हे तर देहाने स्री असलेल्या पण आचार, विचाराने पुरुषीसत्तेची, धर्मसत्तेची वाहक म्हणूनच ज्या स्त्रियांची जडण-घडण हिंदू धर्मात केली जाते, म्हणून अशा स्त्रियांच्या लेखनातूनही वरील प्रवृत्ती अभिव्यक्त होते. परिणामी सावित्रीमाईंच्या जीवापाड कष्टांमुळेच ज्यांना अक्षरे गिरविण्याची, अभिव्यक्तीची संधी मिळाली त्या स्त्रियांपैकी काही आज त्याच अक्षरांचा वापर सावित्रीमाईंच्या अस्तित्व, कार्य,कर्तृत्वास नाकारण्यासाठी करीत आहेत.काही अपवाद आहेत..
बेईमान लेखण्या चालविणारी काही उदाहरणे लेखिका डॉ प्रतिभा अहिरे यांनी नमूद केली आहेत..
' स्त्री मुक्तीच्या महाराष्ट्रातील पाऊलखुणा एक भाग-१, पंडिता रमाबाई. हे लेखन मृणालिनी जोगळेकर यांनी केले आहे. या ग्रंथात संबंधित विषयनिवडीविषयी लेखिका म्हणते एकोणिसाव्या शतकातील स्त्री सुधारणा चळवळीवर ज्यांनी महत्त्वाचा ठसा उमटवला अशा दोन स्त्रिया पंडिता रमाबाई व रमाबाई रानडे. म्हणजे जाणीवपुर्वक त्या सावित्रीमाई यांना Hide करतात.. ...
जात वास्तवावर आधारित समाजरचना पूर्णतः नष्टं करून नवी संरचना उभारण्यासाठीचा पाया म्हणून स्त्री शुद्रांच्या शिक्षणाला अग्रक्रम दिला..जोतिबा म्हणतात,
"या देशात अज्ञान, जातीभेद, भाषाभेद हे दुष्ट रोग आहेत. सारेच लोक दुःखात असताना कोणास मदत करावी हा प्रश्न असला तरी कोणालाच मदत न करता उगीच बसावे यापेक्षा फार दुःख ज्यावर असेज त्यांस आधी मदत द्यावी हे योग्य होय. जातीभेदामुळे अनिवार्य दुःखे महार, मांग यांस सोसावी लागतात. याजकरिता त्यांची निवड विद्याद्वारानेच दाद लागेल. यास्तव त्यासाठीच प्रथम काम चालू केले."
.....
जोतिबांनी कठोर धर्मचिकित्सा केलेली आहे. स्त्री व शूद्रांच्या सामाजिक स्थानाचे सार्थ आकलन त्यांना होते. भारतीय समाजातील स्त्री व शूद्र यांना एका समान पायरीवर ठेवण्यात आलेले आहे व त्यांना एकाच पायरीवर का ठेवण्यात आले? याचे अत्यंत बिनतोड सिध्दान्त त्यांनी त्याकाळी मांडले, जे आजच्या काळातही सिध्द झाले आहेत की, “भारतातील सर्वच स्त्रिया व शूद्र हे एका वर्णसमुहाचे, वंशाचे आहेत. क्षत्रिय व वैश्य हे युरेशियन वंशाचे आहेत. ब्राह्मणांचे गुणसूत्र अत्याधिक प्रमाणात त्या खालोखाल क्षत्रिय व वैश्य यांचे डीएनए युरेशियन्सशी जुळतात व येथील शूद्रातिशूद्र आणि सर्वच वर्ण व जातीच्या स्त्रियांचे डीएनए मात्र युरेशियन्सशी जुळत नाहीत. शूद्र व स्त्रियांचे डीएनए हे भारतातील आहेत. या स्वरुपाचेच विश्लेषण फुल्यांनीही त्याकाळी केले होते. ....
.......भारतीय समाज स्त्रीकडे 'स्वतंत्र व्यक्ती' म्हणून पाहात नाही. 'मातृदेवो' म्हणून तिची देव्हाऱ्यात पूजा मांडली जाते. मात्र घर व घराबाहेर या मातृदेवतेचा सतत उध्दार केला जातो. हा अंतर्विरोध हे भारतीय पुरुषप्रधान समाजाचे वैशिष्ट्य आहे.मनुप्रणित धर्मशास्त्राने स्त्रीला तिच्या देहामध्ये गुरफटून ठेवण्यात यश प्राप्त केले आहे. तिच्या मेंदूपर्यंत तिने पोहचू नये यासाठी शय्या सुख, अलंकार यामध्ये तिला बांधून टाकण्याचा मनुचा सल्ला कसोशीने पाळण्यात आला आहे. चार्वाक,तथागत बुध्द, तांत्रिक पंथ, वराह, मिहिर यांचा स्त्रीकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन वगळता हिंदुधर्मशास्त्रप्रणित दृष्टीकोन स्त्री ही मोक्षाच्या मार्गातील धोंड, मोहाची जननी, पापयोनी,नरकाचे द्वार असाच होता,आहे......
*अभ्यासक्रम कोणता राबवला?*..
सावित्रीमाई विद्यार्थ्यांना केवळ चाकोरीबद्ध अभ्यासक्रम वर्गात शिकवित नव्हत्या तर क्रांतीचा धडा त्या विद्यार्थ्यांच्या काळजाच्या पाटीवर गिरवित होत्या.कारण शिक्षण म्हणजे गुलामी नष्ट करण्याचे हत्यार, पशुत्व हटवून मनुष्यत्व देणारे साधन ही जाणीव त्यांच्या ठायी होती. या योगे सावित्रीमाई धर्मशास्त्रांनी ज्या समाजघटकाला पशूहूनही हीन बनवले होते, त्याला 'मानवत्त्व' प्रदान करण्याचे ऐतिहासिक कार्य करीत होत्या. समाजाच्या स्थितीगतीचे, सामाजिक इतिहासाचे त्याचे आकलन सखोल होते. आनंददायी शिक्षण, विद्यार्थ्यांना विद्यावेतन, आहार, विचारशील व स्वावलंबी विद्यार्थी घडविणे यावर त्यांचा भर होता. वर्गाच्या चार भिंतीत बंदिस्त राहण्यापेक्षा विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्याचे त्यांनी विविध मार्ग हाताळले. विविध संभाव्यतांचा शोध घेतला. विद्यार्थी वर्गात येत नाहीत, अनुपस्थिती आणि गळतीच्या प्रश्नावर त्यांनी केवळ 'साक्षरता अभियान' ठोकळेबाजपणे चालविले नाही तर पालकांची मानसिकता सकारात्मक असेल तर ते विद्यार्थ्यांना शाळेमध्ये पाठवतील हा कार्यकारणभाव शोधून त्यांनी 'पालकांसाठी साक्षरता अभियान' चालविले. असा 'सृजनशील उपक्रम' आजच्या विद्यार्थी गळती आणि अनुपस्थितीच्या दृष्टीने आजही अनुकरणीय आहे. समाज परिवर्तनासाठी विविध आयुधे वापरण्याचा त्यांचा प्रयत्न होता, शिक्षणकार्याचा प्रचार, प्रसारासाठी लेखन, भाषण, कवने ही माध्यमे त्यांनी वापरली. सावित्री-जोतीला आपल्या समाजातील जो सर्वात वंचित, पीडित, शोषीत आहे अशा समाजघटकाला 'ज्ञानी' करण्याचे, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक गुलामीतून मुक्तता करण्याचे 'सूर्य स्वप्न' पडले होते. स्मृतीश्रृतींचा गाळ उपसून त्याखाली गाडलेल्या माणसांची देखणी शिल्प घडविण्याचा ते निकराचा प्रयत्न करीत होते. ..
..... *सावित्रीमाईंचे वाङ्ममय:*
सावित्रीमाईंनी त्यांची लेखणी आणि वाणी समाजप्रबोधनाच्या चळवळीसाठी हत्यार म्हणून वापरली. त्यांच्या काव्याचे स्वरूप आणि काव्याचा कालखंड पाहता आधुनिक काव्याचे 'जननीपद' त्यांच्याकडेच जाणे योग्य आहे.१८५४ मध्ये वयाच्या तेविसाव्या वर्षी त्यांचा 'काव्यफुले' हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. १८९२ मध्ये त्यांनी 'बावनकशी सुबोध रत्नाकर' ही बावन्न कडव्यांची काव्यरचना प्रसिध्द केली. जोतिबांच्या जीवनचरित्रावर आधारित ती आहे. त्याचबरोबर शिवमहीमा स्तोत्राचे सुबोध ओवीबध्द भाषांतरही त्यांनी केले आहे.
आधुनिक काव्याचे जनक म्हणून ज्यांना ओळखले जाते त्या केशवसुतांचा जन्मही तेव्हा झालेला नव्हता. त्यांचा जन्म १८६६ मध्ये झाला व त्यांनी लेखणाला प्रारंभ १८८५ मध्ये केला. म्हणून कालदृष्ट्या जरी विचार केला तर सावित्रीमाईंच्या काव्यनिर्मितीचा कालखंड केशवसुतांच्या आधीचा आहे. काव्याचा आशय व इतर वैशिष्ट्यांवरून जर आधुनिकत्व तपासायचे,जोखायचे असेल तरीही सावित्रीमाई अव्वल ठरतात.सहजता, जनभाषेचा वापर,सामाजिकता, सामाजिक बांधिलकी, समाज परिवर्तनाची क्रांतिकारी वृत्ती, मातृहृदयी शिक्षकाचे मन व भूमिका, द्रष्टेपण, वृत्तीगांभीर्य, जनभाषेचा प्रभावी वापर ही सावित्रीमाईंच्या काव्याची वैशिष्ट्ये सांगता येतात. सावित्रीमाईंनी भावकविता, निसर्गकविता,समाजचिंतनपर, प्रबोधनपर काव्य रचले.भाषणे, निबंध,पत्रांचे संपादन, अनुवाद, पत्रलेखन हे साहित्य प्रकार यशस्वीपणे हाताळले.
सावित्रीमाई या आधुनिक काळातील आद्यकवियत्री, लेखिका आहेत.
*आपण काय करुया.*.
प्रत्येक मातेने सावित्री आणि पित्याने जोतिबा होण्याची गरज आहे; पण सत्यवानाचे प्राण आणणारी 'कपोलकत्पीत' सावित्री सर्वांना पाठ असते; पण ही स्त्री-शूद्रांच्या मृतवत शरीरात आत्मभान, प्राण ओतणारी जोतिबांची खरी सावित्री मात्र माहीत नसते! ही प्रबोधन, परिवर्तनवादी चळवळीची शोकांतिका आहे. म्हणूनच जोतिबा, सावित्रीमाई फुले घरा-घरापर्यंत,मना-मनापर्यंत नेण्याची, घेऊन जाण्याची नितांत आवश्यकता आहे....
आवाहक: रामेश्वर तिरमुखे,जालना.
मो.9420705653.1ऑक्टोंबर 2022.
