टीनएजर मुलांना त्यांच्या भावनांबद्दल बोलतं कसं कराल.....?
टीनएजर मुलांच्या पालकांची बहुतेक वेळेस ही तक्रार असते की मुलं आमच्याशी मोकळेपणाने बोलत नाहीत, घुमी बसून राहतात. त्यांना मुळी काही शेअरच करायचे नसते. मित्रांशी बोलताना खूप जोर येतो. वेळेचे भान उरत नाही पण काही वेळेस मुलं अजिबात बोलत नाहीत किंवा कमी बोलतात.आपल्या भावनांबद्दल एक्सप्रेसिव्ह नसतात. याचा अर्थ त्यांना बोलायचे नसते असे नाही. कधीकधी ही मुलं ओव्हरथिंकिंग करत असतात. विचार खूप असतात पण त्यांची मांडणी मुलांना नीट करता येत नाही. काही मुलं मनातल्यामनात संवाद करतात.
जे विचारांचं तेच भावनांचं. भावना व्यक्त करताना ही मुलं गोंधळतात. कारण मनात उमटणा-या भावनांचे तरंग त्यांना समजत नाहीत, ओळखता येत नाहीत आणि सांगायचं झालं तर व्यक्त कसं व्हावं, आपल्या भावनांचं हसं तर होणार नाही ना? त्याचा चुकीचा अर्थ तर लावला जाणार नाही ना अशा भीतीने ते बोलायला तयार नसतात. काही वेळेस मुलांकडे बोलायला असं काही नसतं. मुलं म्हणतात की काय बोलावं, कशी सुरुवात करावी हेच कळत नाही. मुलांनी फारसं काही ऐकलेले नसतं, वाचलेलं नसतं, आपली मतं कशी मांडावी हे माहीत नसतं, तशी संधी मिळत नाही, सवय नसते मग मुलं मागेमागेच राहतात. गप्प बसणं पसंत करतात. ही मुलं त्यांना झेपेल अशाच मुलांशी मैत्री करतात. कम्फर्टेबल वाटेल अशाच लोकांशी थोडंफार बोलतात. म्हणूनच आपण पालकांनीही मुलांबाबत जजमेंटल न होता लेबलिंग करण्याऐवजी त्यांच्या वयातील बदल सहज स्वीकारायला हवा. त्यांच्यातील बदलाने ओव्हर रिॲक्ट न होता मुलांशी संवाद करण्याचे सकारात्मक, प्रभावी आणि मुक्त असे विविध मार्ग वापरायला हवेत.
जर टीनएजर्स आणि पालक यांच्यात चांगला संवाद होऊ लागला तर त्यांच्यातील रोजचे वाद कमी होतील, मुलं विश्वासाने पालकांशी काही प्रमाणात का होईना संवाद साधायला सुरुवात करतील. मुलांना जेव्हा हे जाणवतं की आपले आईवडील हे फक्त क्रिटिसाईज करतात, आपलं काही ऐकूनच घेत नाहीत तेव्हा ते शेअर करणं बंदच करुन टाकतात. विथड्रॉ होतात. थोडा वेळ घ्या, मुलांनाही वेळ द्या. त्यांच्या मनात हा विश्वास निर्माण व्हायला हवा की तुम्ही एक विश्वासार्ह व्यक्ती आहात, ज्याच्याजवळ मुलं आपल्या मनातील भावना व्यक्त करु शकतात. त्यांच्या भावना इथे सुरक्षित राहतील.
टीनएजर मुलांना त्यांच्या मनातील भावना व्यक्त करायला मदत कशी करता येईल ते आता पाहू या..
मुलांचं बोलणं लक्षपूर्वक ऐका.
जेव्हा मुलं आपल्या मनातील काही तुम्हाला सांगत असतात आणि ते जर तुम्ही पूर्ण लक्ष देऊन ऐकत असाल तर सर्वात महत्वाचं काय होतं तर मुलांच्या बोलण्याला तुम्ही महत्व देत आहात, त्यांचा दृष्टिकोन, भावना समजून घेत आहात असं मुलांना वाटू लागतं.
पण जर आपल्या दोघांच्यात भांडणं, वादविवाद वाढत राहिले तर फक्त गैरसमज निर्माण होतात. अंतर वाढत जातं.नाती विस्कटून जातात. तुम्ही त्यांच्या बोलण्याला मान्यता द्या असं नाही किंवा अमान्य करा असंही नाही फक्त त्यांना हे वाटू दे की तुम्ही त्यांच्या भावना समजून घेत आहात. कामं नंतरही होऊ शकतात. मुलं काही सांगत असताना नीट लक्ष देऊन ऐकलंत तर दोघांनाही चांगलं वाटेल. नात्यात विश्वास निर्माण होईल. त्यांना जाणवेल की तुम्हाला त्यांच्या विचार, कल्पना, भावना समजून घेण्यात रस आहे.
मुलांचं बोलणं, त्यांचे विचार, मतं, भावना दरवेळेस तुम्हाला पटतीलच असं नाही. पण शांतपणे ऐका. या वयातील मुलांना तुम्हाला शॉक लागेल असं बोलायला आवडतं. कधीकधी ते असं काही outlandish स्ट्रेंज गोष्टी बोलतात. का तर त्यांना तुमची प्रतिक्रिया पहायची असते.;तुम्ही जर नॉन जजमेंटल होऊन,आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवून वागलात तर मुलांना आपल्या भावना तुमच्यासमोर व्यक्त करण्यात सुरक्षित वाटेल.लगेच आपलं विरोधी मतं मांडू नका, वादविवाद करु नका.त्यांच्या कल्पना जाणून घेण्याची उत्सुकता दाखवा. यातून संवाद इम्प्रुव्ह होईल. जर तुम्हाला पटत नसलं तरी त्यांच्या मतांचा अनादर वाटेल असं त्यांना दिसायला नको.
जर मुलांनी आपल्या भावना तुमच्याशी शेअर कराव्या असं वाटत असेल तर त्याला संधी द्या. मुलं बोलत असताना मध्ये इंटरप्ट करु नका. कारण यातून गुड लिसनर होण्याचा वस्तुपाठ आपण त्यांना देत असतो.त्यांना आपल्या भावना नॉर्मल वाटू देत. लेक्चर देत बसण्यापेक्षा ते हीच भावना डिफरन्टली कशी मांडू शकतील ते मात्र जरूर दाखवा. मुलांशी बोलताना paraphrase करा म्हणजे मुलांना वाटेल की तुम्ही लक्षपूर्वक ऐकताहात.तुम्ही समजून घेत आहात.मुलांना खात्री होऊ दे की तू वंडरफुल पर्सन आहात.
मुलं जर तुम्ही विचारलेल्या प्रश्नांना एका शब्दात उत्तरं देत असतील तर प्रश्नाचा प्रकार चुकतोय. मुलांना ओपन एन्डेड प्रश्न विचारून संवाद होऊ शकेल.
जसं की कसा होता तुझा आजचा दिवस? असा प्रश्न विचारल्यावर ठीक असे उत्तर येईल. त्याऐवजी काय काय झालं आज दिवसभरात सांग. तर उत्तर विस्तृत येऊ शकेल.
दिवसभरातील काही वेळ हा फक्त आणि फक्त टीनएजर्स मुलांशी बोलण्यासाठीच राखून ठेवा. जेवताना किंवा जेवण झाल्यावर वाॅकला घेऊन जा. गप्पा मारा. मुलांशी कनेक्ट व्हा.
त्यांच्याशी बोलताना तुमच्या आयुष्यातील सकारात्मक गोष्टी जरूर सांगा. म्हणजे मुलांनाही जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन कळेल. प्रेशर नको सहज बोलणं होऊ दे. वेबसिरीज, गेम्स, सेलेब्रेशन, त्यांची ड्रीम्स, फ्रेंडस असे विषय संवादात सहजपणा आणतील. मग त्याला बोलू देत. त्याच्या चुका, वागणं, अपयश यावर लगेच बोलू नका. तू हे चांगलं केलंस हे ऐकायला मुलं अक्षरशः आसुसलेली असतात.
या वयात मुलं खूप चुकतात पण त्यांनी एकदा चूक केली असते आपण मात्र शंभर वेळा ती ऐकवतो. मुलांना सतत जाणीव करुन देतो की तो कसा नालायक आहे. क्रिटिसाईज केल्याने, दोषी ठरवल्याने मुलांची स्व प्रतिष्ठेच्या जणू चिंध्या होतात. मुलं चुकांमधून नक्कीच शिकतात. पण क्रिटिसाईज केल्याने मुलं संभाषणाचा दरवाजाच बंद करून टाकतात. खरं म्हणजे आपण ते करतो. याऐवजी पुढच्या वेळेस तू हे कसं हॅन्डल करशील असे त्याला विचार करायला प्रवृत्त करा.
या संवादात पॉवर गेम खेळू नका.तुम्ही बरोबर आणि मूल चूक किंवा याच्या उलट कधीच नसतं. ते त्या व्यक्तीचे मत असते. ते मूल हेही छोटा माणूसच असतं. आपण दोघंही खरं म्हणजे एकमेकांकडून नक्कीच नवं काही शिकत असतोय फक्त ही तयारी हवी.
त्यांच्या प्रायव्हसीचा आदर करा. मुलांनी तुमच्याशी शेअर केलेल्या गोष्टी चुकूनही कुणाला सांगू नका अन्यथा विश्वास राहणार नाही. इतरांदेखत विशेषतः मित्रांसमोर मुलांची थट्टा करु नका. घालून पाडून बोलू नका. मुलांसाठी ते सगळ्यात जास्त क्लेशकारक आणि अपमानास्पद असतं. ते टाळाच.
मुलं काय वाचतात,:ऐकतात, पाहतात याची माहिती घ्या आणि या विषयांवर संभाषण सुरु करा.; मुलं पटकन बोलकी होतात. नवं माहीत करुन घ्या आणि संवादाची दारं जरूर उघडतील मग संवाद पुढे सुरु राहिल.
मुलांशी बोलताना त्यांच्या इंटरेस्टच्या टाॅपिकवर बोला. उदाहरणार्थ संगीत, खेळ, कॉम्प्युटर, डान्स, आर्ट. सहज होऊ देत बोलणं. तुम्हालाही त्यांचे कल करतील. मुलंही एक्सायटेड होऊन सांगतील.
मुलं बोलताना आपण कमी बोलावं. उपदेश, सल्ले, तुलना टाळाव्या. एकाच गोष्टीवर पुन्हापुन्हा बोलू नये. अति शंका, चौकश्या, प्रश्न आले की मुलं वैतागतात.
जर आपलं चुकलं तर मान्य करुन सॉरी म्हणू या जेणेकरून मुलांनाही तसे वागण्याचे, चूक कबूल करण्याचे शिक्षण मिळते.
त्यांना हे जरूर सांगा की तुम्ही त्यांच्यावर प्रेम करता. ते हसतील, चेष्टाही करतील पण मनातून त्यांना ते आवडलेलं असतं.
संवादासाठी वेगवेगळे पर्याय वापरता येतील. जुने ठराविक प्रकार जसे की वापरले उदाहरणार्थ समोरासमोर संभाषण, प्रश्नांचं बंबार्डिंग, लेक्चरबाजी याने मुलं बोलणं टाकतील. मुलांना डायरी, जर्नल लिहून तुमच्याकडे देऊ देत. मग मुलं विचार करून, नेमकं विचारु शकतील. तुम्हीही रागाच्या भरात अग्रेसिव्ह न होता वेळ घेऊन रिस्पॉन्ड कराल.
मुलं या वयात ॲडल्ट होण्याच्या मार्गावर असतात. आपलं स्वातंत्र्य मिळवण्याच्या प्रयत्नात असतात. त्यात अडथळा आला की मोठ्यांबरोबर त्यांचे खटके उडतात. संवादाची दारे खुली होण्यासाठी खूप संयम आणि वेळ द्यावा लागतो. सावकाश जा या संवाद मार्गावर आणि प्रयत्न सुरु ठेवा. slow and consistent wins. हे लक्षात ठेवा. मुलांच्या भावना म्हणजे त्यांच्या मनाचं प्रतिबिंबच जणू म्हणून त्यांच्याशी संवाद होऊ द्या...
डॉ. स्वाती गानू - टोकेकर,
सुनील इनामदार.

.jpg)