* चहा
अनेक पेय आहेत पण चहाची बरोबरी नाही.सर्वांच्या आवडीचे
असल्याने बदनाम नाही.दिवसाची सुरुवात या पेयाने होते.पाहुणे आले की चहा.चहा न
पाजल्याचे आणि पाजण्याचे बरे वाईट परिणाम आपण बघतोच.अनेक नेते या चहातून घडतात.चहातून चाहते वाढतात.चहा पित गप्पा मारण्याचा एक वेगळा आनंद असतो.एकाच वेळी दोन आनंद.चहामुळे दिवसाची सुरुवात गरम होते.चहा खिशाला देखील परडवतो.चहामुळे तो भिकाला लागला असं
कुणी म्हणत नाही.अनोळखी माणसाची ओळख चहाने होते.घरात वरिष्ठांसमोर घेणे शक्य असते.
अनेक माणसे झोपेतून चहासाठी उठतात.अनेकांना तोंड चहासाठी धूत असतात असे वाटते. चहा उकळतांना त्याचा
एक वेगळाच दर्प असतो.तो उकळेपर्यंत देखील एक उत्सुकता असते.नित्य पिऊन देखील कंटाळवाणे वाटत नाही.काही व्यक्ति मात्र आपण चहा पीत नाहीत असे अभिमानाने सांगतात.त्याची कारणेही न
विचारता सांगतात.मी सकाळी एक कप
चहा घेतो नंतर नाही,संयम वगैरे त्यांना सुचवायचे असते.इतरांकडून मिळाला तरच प्यायचा असाही काहींचा दंडक असतो.ऊठसूट कुणालाही चहा पाजायचा नाही असे काही ठरवतात तर चहाशिवाय
आम्ही कुणाला जावू देत नाही याचाही काहींना सार्थ अभिमान असतो.
चहाचे दुष्परिणामही सांगितले जातात.आवडीपुढे त्याचे मोल नसते.
बोलवा चहाला,मग बोलू.
* मोठी माणसे
मी लहानपणापासून ऐकत आलो आहे, मोठी माणसं.मला अजून कळाले नाही मोठे कोण?
आम्हाला शाळेत मोठी माणसे गांधी, नेहरू,विनोबा,साने गुरुजी , टिळक, सावरकर असं सांगायचे.
माणसे मोठी असतात म्हणजे काय असतात?
पैशाने, शरीराने, मनाने,सत्तेने? मोठे असणे
मला अजून कळत नाही.माणसं म्हणजे माणसं.लहाण मोठं काय आहे?
अंहकाराने, गर्वाने मोठे?
अनेक फडतूस माणसे स्व:तला मोठे समजतात. कुणाचा बाप मोठा,कुणाचा नवरा,कुणाचा मुलगा मोठा.मोठं काय असतं?
पैसा,सत्ता? इतरांना त्रास देण्याची ताकद!
भाडोत्री गुंड पाळायचे, पोलीसांचा वापर करायचा.सरकारी तिजोरी लुटायची हि मोठी
माणसे?.थू असल्या मोठ्या माणसांवर!
केवळ पैशाने, जातीने, ताकतीने कुणी मोठा
नसतो.बापाच्या फूकटच्या पैशावर उड्या मारणारे,हरामाच्या कमाईवर मुजोरी करणारे
कसले मोठे?
दलाली खाणारे,स्वाभिमान नसणारे कसले मोठे?
इतरांना तुच्छ लेखणारी कसली मोठी माणसे.सोन्याच्या महालात राहून स्व:तला
मोठी समजणारी हि मोठी माणसे आहेत?
संकुचित विचारांची,हलकट मनाची हि मोठी
माणसे?
पैशाच्या जोरावर स्वाभिमानशून्य लोकांना
हाताशी धरून सामान्य माणसाला छळणारी
मोठी माणसे?
* बढाईखोरपणा
माणसे अनेक स्वभावाची असतात.त्यामध्ये बढाईखोर हा एक इरसाल नमुना आहे.आहे ते वाढून सांगणे, नाही ते आहे सांगणे त्याची
लक्षणे आहेत.
माझा एक मित्र मोठ्या शहरात अनेक वर्षांपासून राहतो.मी त्याच्याकडे प्रथमच जाणार होतो.त्यास पत्ता विचारला.तो म्हणे,काळजी करू नकोस.आपल्याला सारे
ओळखतात.मित्राची प्रसिद्धी बघून मलाही
बरे वाटले.जेव्हा पोहचलो वेगळाच अनुभव
आला.अनेकांना विचारले.कुणीच ओळखत
नव्हते.तो ज्या गल्लीत राहतो तिथे पोहचल्यावर एकजन म्हणाला, तिथे समोर
पैठणचं कुणीतरी राहतं.
शेजारी विचारावं तर दारं बंद.एक दार ठोठावले.खिडकीवाटे एक लहान मुलगी
म्हणाली, शेजारी बघा .नाव नाही माहित
आम्हाला पण पैठणचे आहेत.बरं वाटलं.
कालबेल वाजवली . मित्राने दार उघडले आणि विचारले,फार उशीर केलास.
मी म्हणालो , तुला ओळखणाऱ्या लोकांना
बोलत होतो.तो गोंधळला.
त्यास म्हणालो ,तुझी बालपणीची सवय अजूनही गेली नाही.
* ईश्वर
दुनिया में जिसका बोलबाला है मगर जो कभी न दिखा न मिला।
कोई उसका भक्त
है, कोई खोजी तो उसे नकारता है। उसके करोंड़ों मंदिर मस्जिद या चर्च, गुरूद्वारा है।
आस्था का उसे नाम दिया जाता है। हजारों
तरह की मान्यताओं और कर्मकांडो में उसका अस्तित्व माना जाता है।वह धारणाओं , कल्पनाओं में, रिवाजों में है।
जो प्रत्यक्ष होता तो इतनी झंझटो में नहीं
होता।कण कण में भगवान कहने वालों को
वह मस्जिद में नजर नहीं आता।सारा जहां
अल्लाह का है, कहने वालों को मंदिरों में नहीं दिखाई देता।
गिता , बाइबल, कुरान को धार्मिक ग्रंथ कहा
जाता है। उसके अनुयायी करोंड़ों में है। उनमें स्पर्धा है।ईश्वर हमारा तुम्हारा हुआ।
धर्मांतरण होने लगा।एक दुसरे को मिटाने
लगे।विवाद बढ़ने लगा।दंगे होने लगे। ईश्वर
के नाम पर ईश्वर की बनाई जीवित मूरत इन्सान को काटने लगे।इसे आस्था कहे या मूर्खता।
धर्म के नाम करोंड़ों लोगों का संगठन ,संगठन की ताकत ,उसकी महत्त्वकांक्षा ,उससे स्पर्धा।स्पर्धा से संघर्ष और मारकाट। राजनीति के लिए उसका उपयोग।सारे संत,सारे महाराज,मुल्ला, पादरी, कथाकार ,प्रवचनकार जब तक अपना वेष नहीं बदलते,जब तक हर कोई
हर ग्रंथ के सार का प्रचार नहीं करता,जब तक सभी प्रार्थनास्थल सबके नहीं होते तब
तक मानव जमात सुख चैन से जी नहीं सकती। धर्म के नाम पर अधर्म होता
हैं , उसे खत्म करना है।मानव को बचाने के लिए।
* शाळा
जिथे नांदते एक वेगळे जग.निरागस जिवांचा वावर.स्वछंदी पाखरांचे थवे जसे.
सर्व अमंगळ भेद विसरून खऱ्या मंदिराची जाणीव व्हावी अशी जागा.
शाळा जिथे अक्षर गिरवले जाते.जगातील सर्व जे सत आणि सुंदर आहे त्याची शिकवण दिली. जाते.एक स्वस्थ समाज घडविण्याचे कार्य जिथे केले जाते.माणसातलं पशुत्व जिथे नष्ट करून
पशुवरही प्रेम जिथे शिकवले जाते.एखाद्या
करोडपतीचा पाल्य हातात झाडू घेऊन शाळा स्वच्छ करतो तेव्हा शाळा या शब्दाची
ताकद समजते.शाळा सोडतांना विद्यार्थ्यांचे
पानावणारे डोळे बघितले की शाळा काय असते कळते.
रस्त्यावर चालतांना मुल जेव्हा, आई बघ ते
आमचे सर आहेत .असं अभिमानाने सांगतात तेव्हा, आस्था शब्दाचा अर्थ कळू
लागतो.पुजाऱ्याशिवाय जिथे भक्ती असते.
शिकणे हेच भजन असते.
शाळा मनातून कधीच जात नाही.आमची शाळा म्हणतांना ऊर दाटून येतो.
शाळेकडे गप्पा मारत चालणारी चिमुकली
पावले . आपलं दफ्तर नीट सांभाळत धिंगामस्ती, जगण्यातली मौज सांगते.
आईनं टिफिन मध्ये दिलेलं धपाटं .मधल्या
सुट्टीतला बेत.
एखाद्या कटाक्षाने दिवस मजेत जाईल असे
वातावरण जिथे असते.आमचे सर ,हा जिव्हाळा जिथे असतो.कुणी खोडी काढली
तर ,मी अमूक सरला सांगेन हा विश्वास जिथे
असतो ती शाळा असते.
कोट्याधीशाचा मुलगा देखील खिचडीसाठी
रांगेत असतो, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक
वेगळी तृप्ती असते हे जिथे बघायला मिळते
ती शाळा असते.
जात धर्म याच्या पलीकडे मानवता जिथे धर्म
असतो ती शाळा. वाईट प्रवृत्ती आणि विचार
ज्या ठिकाणी पुसले जातात.विश्वची माझे
घर शिकवण जिथे असते.जगाला प्रेम अर्पावे
असा सदभाव जिथे असतो,ती शाळा!
श्रमाची जिथे लाज नाही.
दिवसभर प्राप्त केलेली शिदोरी घेऊन ,सुट्टी झाली की घराकडे धावणारी मुले बघून
जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटते.
हजारों विद्यार्थ्यांशी आलेला संपर्क , त्यातून
निर्माण झालेलं नातं,हेच माझं धन आहे.
* हे जीवन सुंदर आहे
रात्रीच्या शांत कुशीतून हलकेच जाग आली.उष:काल होताच जाग कशी येते हे कोडे अजून उलगडलेले नाही.पाखरांचा मंजुळ स्वर कानी पडला.रात्रीच्या नीरव शांततेत कुत्र्यांचे भुंकणे एक वेगळाच रोमांच
देवून गेले होते.
रात्रभर जागून चंद्र तारे विसावले होते.काळोखाचेही आपले एक सौंदर्य असते.न्याहळल्याशिवाय ते कळत नाही.
सूर्योदय होण्याआधी तांबड फूटलं की जगरहाटी सुरू होते.नियमित उगणारा सूर्य
जगाला नियम लावतो.त्याची वाढत जाणारी
प्रखरता , सूर्यास्त पर्यंतचे विविध रूपं बघितली की मंदिरात जाण्याची गरज वाटत
नाही.
जिकडे तिकडे निसर्गाने विविध रंगांची उधळण केली आहे.निर्मात्याने निर्मिलले हे
जग बघितले की मानवाने काही निर्माण करण्याची गरज नव्हती असे वाटते.
असीम असे अवकाश,थव्याने उडणारे पक्षी.अथांग समुद्र,त्याच्या उसळणाऱ्या लाटा, त्यामध्ये विचरण करणारे मासे त्यांची
कलाबाजी मनाला वेड लावणारी आहे.
विविध वृक्ष त्यांची सावली,फळे .किती स्वाद.
फूल पाखरांचे विविध रंग.त्यांचे अलगत उडणे, किती मोहक असते.
रात्रीच्या अंधारात किर्र असा आवाज करून
कुणीतरी सोबती असल्याचा भास होतो.रात्रीलाही एक लय प्राप्त होते.
विविध प्राणी,त्यांचे आकार,रंग ,आवाज किती विविधता.
खुप गंमत आहे जगण्यात.थोडावेळ मानवी सृष्टीतून बाहेर आले पाहिजे.संपूर्ण दर्शन.
* दुःख
मनाला वेदना जाणवते ,त्यास आपण दुःख मानतो.संतानी जगी सर्व सुखी कोण आहे ? असा प्रश्न केला.दु:ख पर्वताएवढे मानले.काहींनी सुखाची दूसरी बाजू मानले.
माणूस दुःखी होतो म्हणजे काय होते.मनासारखे नाही घडले किंवा मनाविरुद्ध काही घडले की दु:ख.परंतु दु:खाला कारणीभूत कोण असते.कधी प्रारब्ध ,कधी कर्म तर कधी इतरांमुळे मानले जाते.जसी सुख हि भावना टिकत नाही.तशी दुःखाचीही भावना टिकत नाही.फक्त त्याची तीव्रता जास्त जाणवते.दात पन्नास वर्षे ठनकला नाही याचे सुख नाही पण पन्नास मिनिटे ठनकला हे तीव्रतेने जाणवते.आपण सुखी आहोत असे समजल्याविना सुखी होता येत नाही.सतत अपेक्षा करायची , तूलना करायची , काय आहे यापेक्षा काय नाही याचा विचार करायचा, अशाने का सुख मिळणार?
बायकोकडून सुखाची अपेक्षा ,नवऱ्याकडून सुखाची अपेक्षा , मुलांकडून अपेक्षा.जेव्हा या अपेक्षा पूर्ण होत नाहीत तेव्हा दुःख.
बहुतेक दुःख हे ओढून घेतलेले असते किंवा
कुटुंबातील अतृप्त व्यक्तिने इतरांना दिलेलं असतं.
नवरा चांगला नाही.दारू पितो, काही कमावत नाही.मारहाण करतो.बायको चांगले
जेवण बनवत नाही किंवा वेळेवर किंवा बनवतच नाही याचे दुःख.दु:खाची हजारों कारणे असतात.सुखाला कारणांची गरज नसते.ज्यांना दुःखी राहायचे त्यांना कारणांची कमतरता नाही.सतत नाराज असणारी, पडक्या चेहऱ्याची माणसे सहवासातील लोकांचाही हिरमोड करतात.
फार छोट्या कारणाने फार दु:खी होणारे
लोक असतात.अकारण दुःख करणारे असतात.काही माणसे कारागृहात दुःखी होत नाहीत.तर काही महालात रडत बसलेले असतात.
काही दुःखे क्षणिक असतात.काही आजन्म मनात घर करून असतात.माणसाला असल्याने सुख होत नाही पण तो नसल्याचे
दुःख निश्चित करतो.
आज श्रीमंत घरांनी हत्या, आत्महत्या होतांना दिसतात.केवळ पैशाने माणूस सुखी
होत नाही.इतरांना सुख देण्यात देखील काहींना सुख मिळते.इतरांच्या ताटातले ओढून खाणाऱ्या माणसांपेक्षा आपल्या ताटातले इतरांच्या ताटात टाकणारे सुखी आहेत.
काही लोकांना इतरांचे सुख सहन होत नाही
म्हणून ते दुःखी होतात.नेहमी कुरकुर करतात.द्वेष करतात आणि दुःखी होतात.
सुखासारखी दुःखाचीही कारणे असतात.प्रत्येकाची ती वेगळी असतात.
दुकानांमध्ये दोन तास घालवून पसंत केलेला
ड्रेस घरी आल्यावर तो दूसरा घेतला असता तर बरे झाले असते म्हणून दु:खी होणारी माणसे मी बघीतली आहेत.लग्नासाठी शंभरावी मुलगी पसंत केल्यानंतरही आपले
चुकलेच असे समजणारे महाभाग असतात च की.
दुःखी असले म्हणजे गंभीर अथवा कर्तव्यशील समजले जाते.आनंदी असलं की
लोक म्हणतात,आज स्वारी फारच खुश!
देख कबीरा रोया,कबीरही रडतो पण इतरांचे
दुःख बघून. दुःखी प्रत्येकजन होतो.कारणे वेगळी असतात पण दुःख उगाळत बसणे योग्य नसते.तो एक मनाचा खेळ आहे.फूकटचे दुःख ओढवून घेवू नये.इतरांनाही ते देवू नये, एवढे आपण निश्चितच करू शकतो.
* दिसणं आणि असणं
मी एकदा मित्राच्या कारमध्ये चाललो होतो.उन्हाळ्याचे दिवस होते. काचा बंद.उकडू लागले.मी काच खाली करू लागलो.त्याने मला थांबवले आणि म्हणाला,काच खाली घेतला तर लोकांना वाटेल ए.सी. नाही! मी अवाक झालो.लोकांचे
इतके भय?
लोक म्हणजे तरी कोण? आपणही लोकांसाठी लोकच आहोत. लोक काय म्हणतील हि बहुधा चिंता असते.
जेवणाच्या पंगतीत ताटातली जिलेबी तोंडात टाकली की सगळे तिकडे बघतात, जसे आपण इतरांना नावे ठेवण्याची संधीच बघत असतो.
बऱ्याच ठिकाणी मुलगी बघायला जातांना मित्राचे चांगले कपडे घालून जातात.एवढेच काय चप्पल पण!
हा सर्व खटाटोप कशासाठी? मी अनेक स्रियांना इतर स्रियांचे दागिने घालून समारंभात जातांना बघितले आहे.
आपले जे नाही ते आपले सांगितले जाते.
अनेक थाटात वावरणारी माणसे भामटी असतात. दिखावा करण्याची त्यांची सवय असते. इतरांना भूरळ पाडण्यासाठी ते असले वरकरणी उपाय करत असतात.
अत्यंत कडक कपड्यात वावरणारी माणसे कंगाल असतात.दाढी मिशा वाढवून इतरांवर
छाप टाकणारी माणसे भित्रे असतात. अनेक निर्लज्ज स्त्रिया अति लाजण्याचे सोंग करतात. निर्बुद्ध माणसे फार विद्वान असल्याचा अविर्भाव दाखवतात.समाजाचे शोषण करणारे समाजसेवक असल्याचा टेंभा मिरवतात. भोगी त्यागी असल्याचे भासवतात.मूर्ख विद्वानाचा उदोउदो करतात.भित्रे शुरांचे गुणगान गातात.खोटारडे
सत्याचे पाईक दाखवतात.
आपण जे नसतो आणि जसे नसतो तसे भासवण्याची गरज नाही. हा न्युनगंड आहे.
कमी सांगितले तर कमी लेखतील या भयातून
त्याचा जन्म होतो.आपण कुणालाही कमी लेखू नये तरच हा दंभ कमी होईल.नसता
जगण्यातला सहजपणा हरवून जाईल.गावाकडे
माझ्याकडे मित्र आले होते. मी त्यांना गोधडीवर बसवले. त्यावेळेस गोधडी अंथरलेली होती.कुणीतरी लगबगीने ती.गोधडी उचलू लागले आणि गादी आणू लागले. गोधडीची लाज वाटणे हा भाग.
हि मानसिकता बदलली पाहिजे. आम्ही साधी माणसे, आम्ही गरीब माणसं, आम्ही अडाणी माणसे असले विधान करण्याची गरज असू नये.
*पैसा
पैसा हे विनिमयाचे साधन आहे. परंतू त्याचे विविध रंग बघितले की
पैसा जीवन बनला आहे असे वाटते. जग त्याच्याभोवतीच फिरते आहे म्हणून तो भगवान आहे. त्याची इच्छा करतात कारण आवडता आहे. त्याला जपतात म्हणजे तो प्रिय आहे. तो प्राणाहून प्रिय आहे कारण त्यासाठी प्राणही देतात. पैशाने इज्जत मिळते
म्हणजे तो कुलवान आहे. पैसा असेल तर लोक बुद्धिमान समजतात .पैसा असेल.तर हुकुम. चालतो.पैशाने मनुष्य मालक बनतो.
पैशाची ताकत.बघा दूबळा अंगरक्षक ठेवतो.
पैशामुळे माणसे हुजरे बनतात. मुजरे करतात.
पैशाची गरज.देवालाही असते. मंदिरात दानपेट्या देवाअगोदर असतात. लग्नात पोरीपेक्षा पैसा महत्त्वाचा ,हुंडा अगोदर घेतला
जातो.पैसा असेल तर मित्र भेटतात. पैशाने
नातेवाईक जवळ येतात.
पुजारी पुजा पैशाची करतो.भक्त देवाकडे पैसा मागतो. पैशामुळे. माणसे व्हि.आय.पी.झाली.देवापुढेही पैशाचा जोर
दाखवू लागली.
पैशाची भाषा सर्वांना कळते. रडणारं मुलं
पैशाने गप्प बसते. पैसा कायम कमी पडतो
जास्त कधीच होत नाही.
लोक नदीत पैसा टाकतात. माणूस मेला की चिल्लर उधळतात.दशक्रिया विधिला पाच दहा पैसे टाकतात. बाजुला माणसे रडत असतांना पुरोहित चिल्लर जमा करत असतो.
प्रेतासमोर डफ वाजवणारा पैसे घेतो.
माणसे कशातही पैसे खातात. पैशाची भूक
शमत नाही.
पैशामुळे सुंदर बायको भेटते. पैशाने मान भेटतो. पैशावरून पद ठरते.
पैसा चोरांना हवा असतो. पैशाने नोकर मिळतात. पैसा हवा तसा वापरता येतो.
भिकारी पैसा कमावतो.
पैशाने माणूस विकला जातो.
पैसा ईश्वराने निर्माण केला नाही पण पैसा ईश्वर बनला आहे एवढे मात्र नक्की!
* होय,मी आस्तिक आहे पण....
होय,मी आस्तिक आहे पण मी कुठल्याही प्रार्थनास्थळी जात नाही कारण ती स्थळे
माणसांत वाटली गेली आहेत. ती स्थळी ईश्वराला वेगळी करणारी आहेत.ती जाती धर्मात विभागली गेली आहेत.ती अंहकाराने
निर्माण झालेली किंवा अंंधश्रद्धेनी निर्माण झालेली आहेत. तिथे भक्त काही मागायला
येतात. आपल्या पापाची क्षमा तरी मागतात.
मला सुखी ठेव म्हणतात.देवाने जन्माला घातलं म्हणतात.देवाशिवाय पान हालत नाही
मानतात. तरीही देवासमोर गाऱ्हाणे मांडतात.
होय,मी आस्तिक आहे पण... मला देवाशी खोटे बोलणे जमत नाही. पोथ्या वाचून ,नुसती पोपटपंची मला नकोशी वाटते. गंध लाऊन,माळ घालून लोकांना फससवण्याचा उद्योग मला जमत नाही.हाडामासाच्या जिवंत माणसासी वाईट वागून ,दगडाच्या मूर्तिला देव माणून तिथे माथा.टेकणे मला पटत नाही.
होय,मी आस्तिक आहे पण.... हजारों प्रकारचे कर्मकांड करणे मला गरजेचे वाटत
नाही. पंडीत,पूरोहिताचे बिनबुडाचे तर्क माझ्या पचनी पडत नाही.त्यांची ती न समजणारी बडबड मला नकोसी होते.
होय,मी आस्तिक आहे कारण... चराचरात मला ईश्वर दर्शन होते.त्याला कुठे शोधण्याची
गरज नाही. तो कोणत्याही प्रार्थनास्थळी नाही. जो ब्रम्हांडाचा स्वामी आहे, त्यास घरकुलाची काय गरज?
प्रत्येक श्वास त्याचा आहे. एवढी जाणीव आहे मला. मग कशाला मी आरती गाऊ.
सूर्य, चंद्र, तारे,आकाश,पशु,पक्षी,फूले, वारे,पाऊस हे. सर्व त्याचे असतांना कसली फूले वाहता.ईश्वराच्या नावाने किती दंगली.
त्याच्या नावाने युद्ध .वाहरे मानवजात .
विश्व जर ईश्वराचे असेल तर संपूर्ण मानवजात
ईश्वराची लेकरे आहेत. मग कशाला पाहिजे बाकी थोतांड.आणि.ईश्वराचे दलाल?
जागे व्हा.
*दगड
शाळेत असतांना शिक्षक अनेक मुलांना दगड म्हणायचे.शिक्षकांना
त्यावेळी काहीही म्हणण्याची मुभा होती.सरकारी नियम नसायचे.गुरूजी अत्यंत
विश्वसनीय असायचे.दगड मोठ्या तुच्छतेने संबोधले जायचे.त्याचा माफक अर्थ आम्हाला
कळायचा.इतर मुले कुत्सीतपणे हसायची.
आज दगड या विषयावर विचार करत होतो.
दगड अचेतन आहे पण निरुपयोगी नाही. त्याचा हवा तसा उपयोग केला जातो.तो सहज उपलब्ध असल्यामुळे त्याची किंमत कळत नाही. दगडाचा शोध कुणी लावलेला नाही त्यामुळे तो मोलाचा वाटत नाही.
थोडा विचार केला तर कळते दगडाने आपले
जीवन व्यापले आहे. दगड सर्व आकाराचे असतात.पाहिजे तसा आकारही दगडाला देता येतो.दगडापासून देव निर्माण झाला.दगडासमोर माणसे नतमस्तक आहेत.
दगडाचे वाडे ,जूने वैभव असायचे.सडक तर दगडानेच बनते.घराच्या पायात दगडं असतात. दगडफेंक ही भालाफेक इतकी प्रसिद्ध आहे. दगड सजवला की तो बोलका होतो.नारळ दगडावर फोडतात. गिरणीमध्ये पिठ दगडावर तयार होते. लग्नाची सुपारी ,मढ्याभोवतीचे मडके दगडाने फोडतात. माणसे दगडावर ठेचाळतात.
दगडाचा इतका.महिमा बघितला तर कुणी दगड म्हंटल्याचे आता तरी वाईट वाटत नाही.
* हसणे
मनुष्य हसणारा एकमेव प्राणी आहे ,जो हसत नसेल तो प्राणी आहे.नवजात बालक जन्मतः
रडत असले तरी कालांतराने हसू लागते. हास्यासाठी विनोद तयार झाले.हास्यास्पद माणसे विनोदाचा विषय असते.नुसत्या अंगविक्षेपानेही हास्य निर्माण होते. हास्य अनेक प्रकारचे असते. हसण्यावरुन देखील
माणसाची ओळख होते. इतरांची फजिती बघून देखील काही लोक हसतात. चार मित्र एकत्र आले की हास्य विनोद होतो. एकमेकांची खिल्ली उडवली जाते.
एखाद्याची विचित्र सवय असेल तर हसू येते.
काही प्रसंग हास्य निर्माण करतात.काही माणसे जाणीवपूर्वक हास्य निर्माण करतात.
इतरांना हसवणे हा काहींचा उद्योग देखील
असतो.हसण्याचे महत्व पटवणारेही आहेत।
हास्यक्लब देखील मोठ्या प्रमाणात आहे.
अनेक वक्ते हास्याचे महत्व जाणतात.
काही लेखक तर विनोदी लेखक म्हणून प्रसिद्ध असतात. हास्यासाठी जीवनाकडे गांभीर्याने बघावे लागते पण गांभीर्याने घ्यावे
लागत नाही.
सर्कशीत विदुषक हसवतो.अवेळी,असंगत,अकारण ,अवाजवी
काही घडले तरी विनोद होतो.कधी नुसत्या संकेताने होतो.लहान मुले एकमेंकांना चिडवून हसतात. इतरांना नावे ठेवत फार हसले जाते. वेडे अकारण हसतात. काही. माणसे न हसणाराला हसतात. काहींचे
विनोद हास्यास्पद असतात. मोठी माणसे ,अधिकारी हसतांना दिसत नाही. हसण्याने प्रतिष्ठा कमी होण्याची त्यांना भीती
असते. स्मितहास्य हा एक काटकसरी प्रकार आहे. खळखळून हसणे त्यांना जमत नाही. काही रूपवती गालात हसतात.तेवढेसे हसू
रसिकांना पुरेसे असते. मला बघून हसली म्हणणारी कित्येक मी बघितली आहेत.
मला का हसतोस ,आक्षेप घेत भांडणारीही असते.
चांगले गुण मिळाले,नोकरी मिळाली,लग्न. जमले हसू येते.
अनेकांचे हसू रौद्र असते. खुन केल्यानंतर हसणारे.छळ करतांना हसणारे.इतरांच्या अडचणी बघून हसणारेही असतात.काहींच्या शरीराच्या ठेवणीला तर काहीच्या परिधान बघून हसू येते.एखाद्याच्या मूर्खपणाचे. हसू येते. मूर्ख देखील हसतात पण मूर्खपणामुळे.
विजयाचा हर्ष झाला की हसू येते. कुणी प्रशंसा केली की चेहऱ्यावर हास्य उमटते.
हसण्याचे अनेक फायदे सांगितले जातात.दिलखुलास. हास्यासाठी मन मोकळे
असावे लागते.हास्य निर्माण करण्यासाठी अचूकता लागते.निरीक्षण लागते.
दुःखाकडे बघुन हसू येते. काहींना सुखात देखील नाही.
हसण्यासाठी अंहकार दुर सारावा लागते.हसत वाहिलेले ओझे हलके वाटते.
हसा आणि हसवा.हा...हा..हा!
*प्रदर्शन*
इतरांवर छाप टाकण्यासाठी स्वतःचे,वस्तूंचे किंवा संपत्तीचेप्रदर्शन मांडले जाते.यामध्ये
हेतू असतो .अंहकार,आत्मप्रौढी किंवा मानसिक रोग असतो.दिसणे आणि दाखविणे
ह्यातला फरक लक्षात घ्यावयास हवा. हत्तीचे
बळ आपसूकच दिसते ,ते तो दाखवित फिरत
नाही.आनंद झाला म्हणून तो व्यक्त होणे वेगळे आणि अंहकारामुळे तो व्यक्त करणे वेगळे. प्रदर्शनाची हि भावना बहुतेकात असते. यशस्वी लोक देखील आपल्या यशोगाथा सांगतात. झाडाच्या मुळ्या कधीच आवाज करत नाहीत. आवाज असतो त्याच्या
पानांचा जे गळून पडतात.
शेतात अगदी जगापासून दूर राहून शेतकरी हजारों झाडे लावतो,त्याची कधी बातमी होत नाही कारण ते प्रदर्शन नाही. पण समाजसेवक, अधिकारी वगैरे चार दोन
रोपे गाडली की फोटो, बातम्या काय प्रचार असतो.जो खरेखुरे कार्य करतो तो प्रदर्शन करत नाही.आई सेवा दाखवण्यासाठी थोडे करते.राजकीय मंडळी तर सरकारी पैशातून
केलेल्या कामाचेही प्रदर्शन करतात.
अनेक मंदिराच्या भिंतीवर देणगीदारांची नावे
असतात. लग्नातल्या भेटवस्तू वर नावे कोरतात.हे ओझे कशासाठी. मोठेपणा मिरवण्यासाठीच ना.नेत्यांसोबत फोटो घ्यायचे
घरात समोर ठेवून दाखवायचे .संताचे,महापुरुषांचे फोटो भिंतीवर टांगून प्रदर्शन मांडायचे.त्या फोटोखाली काय चालते दिसत नाही का?
कपड्यांचे,दागिन्यांचे प्रदर्शन केले जाते. इतरांना रिझविण्यासाठी,छाप पाडण्यासाठी चाललेला तो खटाटोप केविलवाणा असतो.
कोकीळा कुणासाठी गात नाही.गरुड दाखविण्यासाठी उडत नाही. आपले कार्य
स्वाभाविक असावे.त्यामध्ये आटापिटा नसावा.कुणी बघावं ,दखल घ्यावी याची अपेक्षा नसावी.एक निरोगी जीवन जगावं. जगासाठी किंवा जगाच्या तालावर नाचू नये.
*वस्तू*
वस्तू गरजेतून निर्माण होतात आणि मग गरज बनतात. अगदी सुईपासून तर विमानापर्यंत!
ज्याची त्याची कुवत,आवडीनुसार त्या खरेदी केल्या जातात.कधी आवड असून कुवत नसते. कधी कुवत असून आवड नसते. काही वस्तू मात्र सर्वांनाच गरजेच्या असतात. समूहात रहायचे म्हणजे समूहाचे नियम पाळावे लागतात. अनेकवेळा नको असलेल्या
वस्तू ही जमवाव्या लागतात. कित्येकवेळा इतरांसाठी देखील त्याची तजवीज करावी लागते.काहींना वस्तूंची हाव असते. दिसेल ते
खरेदी करावे वाटते.वस्तू शिवाय त्यांना दूसरे
काही दिसत नाही. अनेक घरे नुसती वस्तूंनी
भरलेली असतात. उपयोगात नसलेल्या वस्तूंचा खच पडलेला असतो.नंतर भंगार समजून फेकल्या जातात.
भिकारी आपल्या चिंध्या सांभाळून ठेवतो.त्याची ताट वाटी त्याच्या वस्तू त्याच्यासाठी अमूल्य असतात. श्रीमंताकडे
वस्तूंचा वापर करायला वेळ नसतो.
लहान मुले आपल्या वस्तू सांभाळतात, कुणी हात लावला तरी ओरडतात. आपल्या वस्तूचे ते बाळकडू असते.वस्तूभांडारात भाड्याने
वस्तू मिळतात. कामापूरत्या त्या वापरायच्या असतात. क्वचित गरजेच्या महागड्या वस्तू
विकत घेणे शक्य नसते. अनेक लहान वस्तू
फार उपयोगाच्या असतात. विवेकशील माणसे ते जाणतात. त्यांचा संग्रह ठेवतात.
घर वस्तू भांडार बनू नये, याची काळजी घ्यावयास हवी.तसेच लहान वस्तू शेजारच्या घरातून आणायची हेही घडू नये.
केवळ हौस म्हणून वस्तू खरेदी करु नये. किंवा इतरांशी स्पर्धा करण्यासाठी.वैभवासाठी ती खरेदी असू नये.
वस्तू प्रदर्शन असू नये. वापराच्या वस्तू असाव्यात. वापराचे सुख प्राप्त करावे.
अनाठायी वस्तू खरेदी करु नये. फाजिल हट्ट
न करता विवेक वापरावा.
....ना.रा.खराद
