╭═════════════════════╮
*सार्थ श्रीएकनाथी भागवत*
*🌷अध्याय तिसरा🌷*
*🌸ओवी–३६१ ते ३७०🌸* ╰═════════════════════╯
*जेणें आपणासी होय दुःख । तें भूतांसी करीना निःशेख । जेणें आपणासी होय सुख । तें आवश्यक करी दीना ॥ ३६१ ॥*
*_भावार्थः_* _ज्या कृतीने स्वतःला दुःख होते , ती दुःखदायक कृती दुसऱ्याकरिता जो मुळीच करीत नाही , ज्या साधकाने स्वतःला सुख होते तेच साधन दीनदुर्बलाकरिता अवश्य।करीत असतो . ।। ३६१ ।।_
*सर्व भूतीं दया समान । कदा न बोले कठिणपण । भूतांची पीडा निवारण । करोनि आपण सुखोपाय चिंती ॥ ३६२ ॥*
*_भावार्थः_* _सर्वभूताविषयी ज्याची समान दया असते , जो कोणालाही कठोर बोलत नाही , भूताचे दुःख निवारण करून स्वतः तो भूतांना सुख कशाने मिळेल ते साधन करण्याच्या चिंतेत निमग्न असतो . ।। ३६२ ।।_
*जीवमात्रीं दुरुक्ती बोलतां । जिव्हेच्या घेवों पाहे जीविता । भूतीं दुष्टपण चालितां । समूळ निजचित्ता निर्दाळू पाहे ॥ ३६३ ॥*
*_भावार्थः_* _कोणत्याही प्राण्याला चुकून कठोर अश्लील बोलणे झालेच तर जिव्हेचे प्राण घेऊ पाहतो . जीभ कापून टाकण्याकडे प्रवृत्त होतो . भूताविषयी दुष्टपणाचा व्यवहार घडला तर स्वतःच्या चित्ताला त्याच्या कारणासह दंड न करू पाहतो . ।। ३६५ ।।_
*भूतांसी जेथ पीडा पावे । त्यातळीं जीव घालूं धांवे । जीवापरीस भूतें सर्वें । दयागौरवें पढियंतीं ॥ ३६४ ॥*
*_भावार्थः_* _भूतांना ज्या शस्त्रादी साधकाने पीडा होते , त्या शस्त्रादिकांच्या तळाशी आपला जीव घालू पाहतो . त्यांच्यावर होणारे आघात आपल्या अंगावर घेतो . त्याला आपल्या प्राणापेक्षाही सर्वभूते दयेच्या अमर्यादपणाने प्रिय झालेली असतात . ।। ३६४ ।।_
*ऐसें जें कारुण्य पूर्ण । त्या नांव ‘ दया ’ संपूर्ण । ; आतां मैत्रीचें लक्षण । असाधारण तें ऐका ॥ ३६५ ॥*
*_भावार्थः_* _असे जे व्यापक कारूण्य आहे , त्याला ‘ दया ’ हे नाव आहे . आता मित्रत्वाचे असाधारण लक्षण कोणते आहे , ते संपूर्ण सांगतो . ।। ३६५ ।।_
*सर्व भूतांचे ठायीं । सुहृदावांचोनि दुजें नाहीं । तरी न करितांचि मैत्री पाहीं । ठायींचे ठायीं अलोलिक ॥ ३६६ ॥*
*_भावार्थः_* _सर्वभूताचे ठिकाणी ‘ हे आपले सुहृत् आहेत ’ , सुहदावाचून दुसरे कोणी नाहीत , आपल्याविषयी याचे मनात चांगले आहे , असे मानल्यामुळे कोणाशीही बाह्यतः औपचारिक मैत्री न करताच जागच्या जागीच मनातल्या मनातच अलौकिक प्रेमभावात्मक मैत्री निर्माण होते . ।। ३६६ ।।_
*जे विषयवियोगें न विटे । नाना विकल्पीं न तुटे । आलिया परम संकटें । मैत्री नेटेंपाटें सदा ग्राह्य ॥ ३६७ ॥*
*_भावार्थः_* _जी मैत्री विषयाच्या वियोगाने विटत नाही , नाना प्रकारच्या संशयांनी तुटत नाही , मोठमोठी संकटे आली तरी नष्ट होत नाही , बळकटपणाने जी सर्व काळ संग्राह्य जवळ करण्यास योग्य असते . ।। ३६७ ।।_
*या नांव गा मित्रभावो । प्राण गेलिया न तुटे पहा हो । देखतां कल्पांतकाळघावो । निजमित्रसमुदावो एकवटे कीं ॥ ३६८ ॥*
*_भावार्थः_* _यालाच मित्रभाव म्हणतात की , प्राण गेला तरी , जो तुटत नाही . अशी भूतमात्राविषयी निरपेक्ष प्रेमभावात्मक मैत्री करणारावर प्रलयकालाचा घाव पडत आहे , असे बघताच सर्व मित्रांचा समुदाय त्याच्या सहाय्यार्थ एकत्रित होतो . ।। ३६८ ।।_
*ऐसी आचरतां निजस्थिती । श्रद्धा उपजे सर्वां भूतीं । त्या श्रद्धेची व्युत्पत्ती । यथानिगुती सांगेन ॥ ३६९ ॥*
*_भावार्थः_* _याप्रमाणे भूताविषयी दया , मैत्री करण्याच्या स्वाभाविक अवस्थेत व्यवहार करीत असता सर्व भूताविषयी श्रद्धा म्हणजे प्रेमपूर्वक आदर उत्पन्न होतो . त्या श्रद्धेचे विश्लेषण यथार्थपणाने थोडक्यात सांगतो . ।। ३६९ ।।_
*नवल श्रद्धेचें लक्षण । ब्रह्मा मुंगी समसमान । तरी यथोचित विधान । सर्वथा जाण चुकेना ॥ ३७० ॥*
*_भावार्थः_* _श्रद्धेचे लक्षण मोठे आश्चर्यकारक आहे . ते असे की , येर्हवी ब्रह्मदृष्टीने ब्रह्मदेव आणि मुंगी समान आहेत . तरीसुद्धा उपाधीच्या दृष्टीने सर्वभूतांत परस्परभेद असल्यामुळे त्यांच्या जन्मजात उच्चनीच भेदानुसार त्यांच्याशी यथाधिकार यथायोग्य धार्मिक व लौकिक व्यवहार करण्याविषयी सर्वतोपरी चुकू नये . ।। ३७० ।।_
╭═════════════════════╮
╰═════════════════════╯
