*संत परंपरेतील एक अग्रणी संत : संत कबीर*
【आम्रपाली वाघाळकर,जालना】
संत कबीरांच्या जयंती निमित्त त्यांच्या कृतीविचारांना अभिवादनपर हा लेख. 📝🙏🏻
संत कबीर हे भारतीय संत परंपरेतील एक क्रांतिकारी व अग्रणी व्यक्तिमत्व होते.त्यांनी तत्कालीन रुढी-परंपरा-अंधश्रद्धा आणि अमानवीय मूल्यांच्या विरोधात बंड पुकारले.आपल्या मनातील हेच बंडाचे स्फुरण त्यांनी दोहारूपी काव्याच्या माध्यमातून समाजासमोर ठेवले.ते धार्मिक व सामाजिक जीवनाचे शुध्दीकरण व पुर्नमांडणी करु इच्छित होते. त्यामुळेच ते सामाजिक व धार्मिक क्षेत्रात असणाऱ्या विशिष्ट लोकांच्या वर्चस्वावर शब्दांचे आसूड ओढून ते मोडीत काढू पाहतहोते.त्यामुळे त्यांचे संपूर्ण जीवन याच सामाजिक व धार्मिक प्रवाहाविरोधी राहिले आहे, हे आपल्या लक्षात येईल.
*जाति न पुछो साधू की*
*पुछ लिजिए ज्ञान* ।
*मोल करो तलवार का*
*पडा रहन दो म्यान*"।।
ज्याप्रमाणे तलवारीच्या म्यानाची किंमत न विचारता तलवारीची किंमत विचारली जाते,त्याप्रमाणे साधू-संतांची जात विचारात न घेता त्यांचे ज्ञान विचारात घेणे गरजेचे असते.
*जन्म व बालपण*
उत्तर प्रदेशातील गंगा नदीच्या तीरावर बनारस (वाराणसी)हे शहर वसलेले आहे. तेथेच जवळ लहरतारा नावाच्या गावात नीमा आणि निरू नावाचे कोष्टी (कोळी) समाजाचे एक जोडपे राहत होते, त्यांचा कपडे विणण्याचा व्यवसाय होता. त्यावेळी अनेक लोकांनी सुफी संतांच्या प्रभावाखाली धर्मपरिवर्तन केले.त्यातच नीमा आणि निरु धर्मपरिवर्तन करून "जुहाला"जातीचे बनले होते.
प्रा.गौतम निकम
यांच्या म्हणण्यानुसार "नीमा आपल्या प्रसवकाळात मगहर(मगध) येथे जात असतानाच,मगहरजवळील उपवनात नीमाने एका बालकास जन्म दिला.पुढे तेच बालक *कबीर* नावाने ओळखले जाऊ लागले.संवत १४५५ म्हणजेच इसवी सन १३९८ साली संत कबीरांचा जन्म झाला."कबीरांचे बालपण लाडात गेले. लहाणपणापासूनच त्यांना एकांत आवडत असे.
*शिक्षण व गृहत्याग*
संत कबीर हे सात वर्षाचे असताना निरू त्यांना शिक्षण
घेण्यासाठी एका गुरुकुलात घेऊन गेले.तेथे, (तुम्ही पूर्वाश्रमीचे शूद्र आहात) "तू शूद्र आहेस,तुला येथे शिक्षण घेता येणार नाही," असे म्हणून त्याठिकाणच्या ब्राह्मण गुरुंनी काढून दिले. पुढे निरु मदरशात गेले, तेथेही धर्मपरिवर्तित असल्याने त्यांना शिक्षण देण्याचे नाकारले.त्यानंतर आई-वडिलांना कामात मदत करत ते घरीच राहू लागले.
कबीर २० वर्षाचे झाले असता,आई-वडिलांनी त्यांना विवाहासाठी विचारले, विवाहासाठी त्यांनी साफ नकार दिला. कबीर एकांतात बसून विचार करायचे,"बहिष्कृत जातीचा आणि शिक्षणाचा कोणताही संबंध नाही" हे कबीरांच्या लक्षात आले होते.
एके दिवशी ते कोणालाही न सांगता घरुन निघून गेले . ते तथागत बुद्धांनी प्रथम धम्मोपदेश केलेल्या सारनाथ येथे गेले,आणि सम्राट अशोकाने गाढलेला प्रस्तर त्यांनी पाहिला.तेथे काही साधूंच्या संपर्कात ते आले आणि त्यातूनच ज्ञानार्जनाची इच्छा वाढीस लागली.अक्षरज्ञान प्राप्त करून अभ्यास केला आणि ज्ञान प्राप्त केले.
" निगुरा ब्राह्मण नहीं भला ।
गुरुमुख भला चमारा ।।
देवतन से कुत्ता भला ।
नित उठे भूखे द्वार.."।।
संत कबीर आपल्या दोह्यात सांगतात की,अहंकारी व गर्विष्ठ ब्राह्मण गुरुपेक्षा, एखादा चांभार गुरु चांगला.म्हणजेच त्यांना प्रत्यक्ष ब्राह्मण गुरुंचा अनुभव आला होता,त्यांना शिक्षण देण्यास याच ब्राह्मण गुरुने नाकारले होते.कबीर सांगतात की, ह्यांच्यापेक्षा सर्वसामान्य लोक हे मानवतावादी आणि विवेकी आहेत.देव ही संकल्पनाही त्यांना मान्य नव्हती,हे त्यांनी आपल्या वरील दोह्यातून दाखवून दिले आहे.
एकंदरीत संत कबीर यांचे विचार हे सत्यच आहेत,आज आपण पाहतो की,जगभरात 'कोरोना,कोव्हिड -19' नावाचे संकट आले आहे .अशावेळी सर्व देवी-देवतांचे मंदिरे बंद झालेली आहेत आणि संत गाडगेबाबांनी सांगितलेले देव मात्र..(देव दगडात नसून माणसात आहे) डॉक्टर्स, पोलीस आणि सफाई कामगारांच्या माध्यमातून आज मदतीस धावून आले आहेत.
*गुरुंच्या उपदेशानुसार मार्गक्रमण*
संत कबीर आपल्या सहकाऱ्यांना उपदेश करत किंवा ज्ञान देत तेव्हा इतर सोबती त्यांना आश्चर्याने पाहत असत.३० वर्षे वयाच्या कबीरांचे वैराग्य जीवन उजळून निघालेले दिसत असे.संत कबीर हे उत्तर भारतातील एक प्रख्यात मध्ययुगीन संत होऊन गेले.म्हणूनच डॉ.विलियम द्वार म्हणतात की , *"मला हे सांगण्यात मुळीच संकोच वाटत नाही की भारतीय चिंतनधारेच्या इतिहासात गोतम बुध्दांच्या नंतर कदाचित कोणी कबीरासारखा अन्य क्रांतिकारी संत उत्पन्न झाला असावा*
संत कबीर यांना बुधिसार आणि पीताम्बर पीर यांनी तथागत बुद्धांचा मार्ग सांगितला. त्यांच्यावर तथागत बुध्दांच्या व समतावादी थोर महापुरुषांचा प्रभाव होता. ते म्हणत या जगात एकच बुध्दीमंत समाजशील जात आहे आणि ती म्हणजे *मानवजात*. त्यामुळे मानवाच्या कल्याणासाठीच जीवन जगावे,त्यासाठी मानवाने आपले चारित्र्य जपावे, सदाचारी जीवन जगावे.संत कबीरांच्या मनात आपल्या गुरुंबद्दल नितांत आदर व सन्मान होता.
*कबीरांच्या प्रेरणा व आदर्श*
भारतातील अस्पृश्य, उपेक्षित, बहुजन समाज या सर्वांच्या वतीने कबीरांनी पुढाकार घेऊन हा धर्मसंगर उभारला. प्रचलित भारतीय धर्मव्यवस्थेलाच कबीरांनी आवाहन केले होते. तथागत बुद्धांबरोबरच त्यांच्यावर महावीर व सुफी संतांच्या मानवतावादी विचारांचा प्रभाव होता. त्यांच्या प्रेरणा घेऊन भारतीय जीवनशैली बदलून टाकण्याचा त्यांचा मानस होता.
"हीच आमची प्रार्थना
हेच आमुचे मागणे
माणसाने माणसांशी
माणसासम वागणे"
या उक्तीप्रमाणे माणसांनी माणसासारखे वागावे,हेच त्यांना अपेक्षित होते."मानवधर्म हाच मार्ग त्यांनी जोपासला होता." कबीरांना या जातिव्यवस्थेचा खूप त्रास झाला होता.
*कबीरांचे वर्ण व जातिव्यवस्थेविरुध्दचे विचार*
संत कबीर यांना अभिप्रेत असणारा मानवधर्म त्यांनी आपल्या दोह्यातून सांगितला आहे.त्यांनी मंदिर, तीर्थयात्रा,पुजापाठ हे एक थोतांड असल्याचे लोकांना पटवून दिले. त्यांनी हिंदू आणि मुस्लिम समाजात ऐक्य घडवून आणण्याचा सतत प्रयत्न केला. त्यांची हिंदू-मुस्लिम धर्माच्या तात्विक विरोधातील वक्तव्ये बहुजन समाजाला आपली वाटू लागली.
*चलती चाकी देखकर*, *दिया कबीर रोय*।
*दो पाटन के बिच मे*,
*सालित बधा न कोय*"।।
आपल्या दोह्यात ते सांगतात की,असे वैराग्य जीवन जगण्यापेक्षा आपल्या ज्ञानाचा उपयोग अशा लोकांसाठी करावा,जे या दोन्ही विचारधारेत (हिंदू-मुस्लिम) सारखे भरडले जात आहेत व त्यामुळे त्यांचे जीवन निर्जीव माणसांसारखे झाले आहे.
*पोथी पडी जग मुआ*,
*पंडित भया न कोय* ।
*ढाई आखर प्रेम कर*,
*पढे सू पंडित होय* ।।
तसेच
*तुरक तरीकत जानिये*,
*हिंदू वेद पुराण*।
*मत समझावण कारण*,
*कछु थक पढिये ज्ञान*।।"
त्यांनी आवाहन केले की, जाती -पातीच्या बंधनातून मुक्त होऊन त्या पलीकडे मानवता नावाचा धर्म आहे,त्यात सामील व्हा. त्यांनी प्रचलित जातिव्यवस्थेविरुध्द, उच्चनीचतेविरुद्ध आणि पर्यायाने त्यांना पाठबळ पुरविणाऱ्या धर्मव्वस्थेविरुद्ध आणि अंधश्रद्धेविरुद्ध प्रचंड बंड उभारले होते. ते आपल्या दोह्यात ह्या जातिव्यवस्थेची चीड व्यक्त करतात. ते म्हणतात की,
*देखों चतुरों की चतुराई*,
*चार वर्ण आप बनावे*
*ईश्वर की बतलाई*...।"
चार वर्ण हे
सनातनी लोकांनी त्यांच्या फायद्यासाठी बनवले असून सर्वोच्च स्थानावर स्वतःला ठेवले आहे.हे वर्ण ईश्वराने बनवले आहेत असे ते लोकांना सांगून फसवतात.मग मला सांगा की, ईश्वराची लेकरे ही एक ब्राह्मण व एक शूद्र कसे काय असतील. त्यांच्या वरील दोह्याच्या सारावरुन प्रा.राजा ढाले म्हणतात की
*संत कबीर हे भारतीय साहित्याचा मानबिंदू असून ते एक भारतीय साहित्य स्रूष्टीतील सर्वश्रेष्ठ असे आदिविद्रोही कवी, तत्वचिंतक व द्रुष्टा आहेत* *
*कबीरांचा धर्म हा मानवतावादी व अहंकार विहिन*
संत कबीर हे समाजाच्या गतिविधीकडे उघड्या डोळ्यांनी पाहून त्यांच्या गुणदोषांची चर्चा करणारे समाजक्रांतिकारक होते.तथागत बुध्दांप्रमाणेच अनुभव प्रामाण्यवादावर त्यांनी भर दिला होता.आणि त्यापढे त्यांना ग्रंथप्रामाण्यवाद नगण्य वाटत होता.
*मैं कहता हुँ,आँखिन देखी*।
*तु कहता,कागज की लेखी* ।"
या दोह्यातून त्यांनी वेदप्रामाण्य नाकारलेले दिसून येते. म्हणजेच वेदप्रामाण्य नाकारणारे तथागत बुद्ध आणि वेदावर हल्ला करणारे कबीर यांची वैचारिक पातळी एकच होती,हे समजते.तसेच याच वेदांवर संत तुकाराम महाराज सुद्धा, *वेदांत आमच्या घरी पाणी भरी* ."अशा पद्धतीने वेदांची खिल्ली उडवून त्यांना नाकारतात.तसेच सर्व समतावादी संत आणि महापुरुषांनी या वेदप्रामाण्याला नाकारल्याचे दिसून येते.
समता,स्वातंत्र्य,बंधुता आणि न्याय या मुलभूत तत्वांवर आधारित कबीरांनी दोहे (काव्य) मांडलेले आहेत.आजही कबीरांचे दोहे ऐकावेसे वाटतात.त्यांनी आपला धर्म हा मानवतावादी व अहंकारहीन असावा,असे सांगितले आहे. जी गोष्ट मानवजातीच्या कल्याणाची नाही ती नाकारली पाहिजे,हे दाखवून दिले. कबीरांचा अंधश्रद्धेवर व चुकीच्या धार्मिक गोष्टींवर विश्वास नव्हता. ते तथागताप्रमाणेच तर्क आणि बुद्धीप्रामाण्याला महत्व देत.
संत गाडगेबाबा यांनीही सांगितले आहे की,
*अंधश्रद्धा ही समाजाला लागलेली कीड आहे*.तसेच *अज्ञान व अस्पृश्यता या तीन 'अ' पासून जोपर्यंत समाज स्वतःला दूर करणार नाही, तोपर्यंत त्याचा विकास होणार नाही*." कबीरांनीही हाच विचार आपल्या कार्यातून व दोह्यातून दिल्याचे आपल्या लक्षात येईल.
*डॉ.आंबेडकरांनी कबीरांना आपले गुरु मानले*
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संत कबीरांना आपले गुरु मानले होते.एके ठिकाणी ते असे लिहितात की,"लहानपणी आम्ही जेव्हा आमच्या वडिलांकडून संतांचे अभंग आणि संत कबीरांचे दोहे ऐकायचो, तेव्हा घरातील वातावरण मंगलमय होत असे." याचा अर्थ अगदी बालवया पासूनच डॉ.आंबेडकरांवर कबीरांच्या विचारांचे संस्कार झाल्याचे स्पष्ट होते. महात्मा फुले तथा इतरही थोर विभूतींनी कबीरांच्या दोह्यातील विचारांचे अनुसरण केल्याचे दिसून येईल.
*कथनी मिठी खांडसी*,
*करनी विष की लोय*।
*कथनी तजै करनी करे*,
*विष में अमृत होय*।।"
संत कबीर यांनी आपल्या कथनी आणि करनी मध्ये कधीच फरक केला नाही.यातून त्यांनी समाजासमक्ष एक आदर्श घालून दिला. त्यांनी हाच विचार वर्धमान महावीर,तथागत बुध्द तसेच समतावादी थोर स्त्री- पुरुषांकडून घेतलेला होता.त्यामुळेच ते अस्पृश्यता ,अंधश्रद्धा,चुकीच्या धार्मिक रुढी-परंपरा यांच्याविरोधात लढा देऊ शकले. यामुळेच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना आपले गुरु मानले.
*कबीरांचे शेवटचे दिवस*
संत कबीर विषमतावादी धर्मव्यवस्थेविरुद्ध लढा देत असल्याने तत्कालीन सनातनी मंडळींनी त्यांना अनेक वेळा काशी सोडण्यासाठी बजावले होते. याच ओघाने त्यांना धमक्याही देण्यात आल्या होत्या. परंतु कबीर या धमक्यांना न जुमानता आपले समाज हिताचे काम करतच राहिले.
प्रा.गौतम निकम यांच्या मतानुसार,"एके रात्री चार -पाच सनातनी लोकांनी कबीरांना उचलले आणि गंगा नदीच्या प्रवाहात फेकून दिले.त्यात त्यांचा शेवट झाला असे समजून ते निघून गेले.परंतु कबीरांनी मोठा प्रयत्न करून स्वतःचा जीव वाचवला व ते बाहेर आले.पुढे ते आपले मार्गदर्शक बुधिसार व पीताम्बर पीर यांना भेटले असता घडलेली हकीगत सांगितली. त्यामुळे सर्वांनी विचारांती असे ठरवले की,आपण मगहरला जाऊ .ठरल्याप्रमाणे ते मगहरला गेले. तेथेही त्यांनी काही वर्षे आपले कार्य चालूच ठेवल व काही काळानंतर त्यांचे निधन झाले."
अशा तऱ्हेने संत कबीरांना समाज परिवर्तनाचे व समाजहिताचे काम करत असताना मृत्यु आला.
जय भारत
मा.आम्रपाली वाघाळकर (लांडगे) ,जालना
vinodwaghalkar83@
gmail.com
