हार्दिक
आजचा काळ हा औपचारिकतेचा आहे,धावपळीचा आहे.शुष्क,कोरडा आहे.हार्दिक असे काहीच उरले नाही.
सगळं काही वरकरणी . हार्दिक हा शब्द देखील हार्दिक
नसतो.चेहऱ्यावरचे हावभाव देखील आता बदलत नाहीत.माणसे वाढदिवसाला आणि दिवसाला सारखाच
चेहरा घेऊन बसतात.
नेतेमंडळी तर इतकी बेगडी आणि भावनाशून्य झाली की
त्यांची सांत्वना आणि प्रेरणा सारखीच वाटू लागते.कुणाशीही कसलेही घेणे देणे नसलेली ही जमात
औपचारिकतेचा कळस असते.
कुठे जायचे , कशासाठी जायचे सगळे नियोजित, यांनी
फक्त निर्जिव शुभेच्छा वगैरे किंवा बेगडी सहानुभूती
दाखवायची.
कुटुंबातील नाते देखील हार्दिक राहिले नाही.अश्रू लोप
पावत चालले आहेत.डोळ्यांतील तेज नष्ट झाले.भावनांचा होत चाललेला लोप हा निष्ठुरता ,स्वार्थ यांचा परिपाक आहे.
विरह वगैरे शब्द ऐतिहासिक होण्याच्या मार्गावर आहेत.
तळमळ,कळकळ,हळहळ केव्हाच गायब झाले आहेत.
आतुरता,जिव्हाळा कशाला म्हणतात हे आता माहिती नाही.कृतज्ञता,उपकार कशासोबत खातात ठाऊक नाही.
वात्सल्य हे फक्त प्राण्यांमध्ये दिसते आहे.
प्रणय वगैरे थोतांड झाले आहे.
वस्तूंबद्दलचे अति प्रेम माणसांपासून दूरावा वाढण्यास
कारणीभूत ठरले आहे.धाय मोकलून रडणे तर दूर एखादा
अश्रु देखील आता वाहताना दिसत नाही.आडात नाही तर
पोहऱ्यात कोठून येणार?
माणसे आता झूरत नाहीत, कुणासाठी झिजत नाहीत.
प्रेमाश्रू तर मूळीच वाहत नाहीत.
नात्यातली आपुलकी, जिव्हाळा, आस्था आता उरली नाही.स्वार्थापुरता संबंध उरला आहे.
हार्दिक शुभेच्छा, हार्दिक अभिनंदन हे फक्त औपचारिक.
स्पंदन आता बोथट झाली आहे.मिलनाची आस ना विरहाच्या वेदना . सर्वकाही बोथट, कोरडे.भावनेचा ओलावा आटला आहे.प्रेमाचा समुद्र घटला आहे.
कोरड्या वातावरणामध्ये जसे गुदमरून जाते तसे या
भावशून्य मानवी वातावरणात देखील जगणं केवळ औपचारिकता वाटते.
ना.रा.खराद
