पाहुणे
भारतीय संस्कृती मध्ये अतिथी अथवा पाहुणे ईश्वर सदृश्य आहेत.होते!
पाहुणे अनायास असतात.त्यांना निवडता किंवा बदलता येत नाही.ते आहे तसे स्विकारावे लागतात, टिकवावे लागतात.
पाहुण्यांचे उपपाहुणे खुप असतात.ते दूरून
जवळचे असतात.काही लांबचे तर काही
जवळचे पाहुणे असतात.पाहुणे तसा पाहुणचार,अशी नवी म्हण निर्माण करता येवू शकते.
पाहुणे हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.
लग्न ,मौत या प्रसंगी तर हवेच.आजारी
असतांना भेटायला जाणे.भांडणे मिटवण्यासाठी जाणे . थोडक्यात पाहुणे सोडून काही होत नाही.आपले ते खरं विश्र्वअसतं.आपल्या गुण दोषांची चर्चा करणं.प्रगती अधोगती विषयी चिंता करणं.
हि पाहुण्यांची कामे असतात.अमुक पाहुणे
खुप चांगले आहेत इथपासून तर तमुक पाहुण्याची घरची पायरी आपण चढत नाही इथपर्यंत हे पाहुणे कांड असतं.
पाहुणे वैशिष्ट्ये पूर्ण असतात.काही बढाईखोर तर काही मौनी असतात.काही भांडखोर तर काही फूकटे असतात.काही अंधश्रद्धाळू तर काही तत्त्वज्ञानी असतात.
सर्व पाहुण्यांना सामावून घेणे मोठी कसरत असते.
पाहुण्यांमध्ये हेवेदावे फार असतात.दोन पाहुणे एकत्र आले म्हणजे इतर पाहुण्यांची समीक्षा होते.
बायकोची माहेरची माणसे .पाहुण्यातला हा सर्वश्रेष्ठ प्रकार आहे.पाहुणचारांची परिसिमा
तिथे बघायला मिळते.मुख्य देवीला प्रसन्न राखण्यासाठी उपदेवतांची पुजा करावी लागते.
पाहुणे गरीब तसे श्रीमंतही असतात.श्रीमंत पाहुण्यांचे एक कुतूहल असते.अमूक मोठा मनुष्य आमचा पाहुणा आहे सांगताना छाती भरून येते.गरीब पाहुणे उपेक्षित असतात.
अमूक पाहुणा माळकरी,तमूक दारूड्या असे बिरूद लावले जाते.
काही पाहुणे तुसडे असतात.त्यांच्याकडे कुणी पाहुणा येत नाही,ते कुणाकडे जात नाही.आपण कुणाच्या अध्यात मध्यात नसतो असं ते निक्षून सांगतात.
काही पाहुणे सतत द्वेष करतात.येणेकेणे नावे ठेवतात.चुका शोधतात.
काही पाहुणे सतत वेगवेगळ्या पाहुण्यांकडे
भेटी देतात.ठान मांडून बसतात.आता आपल्याला काही काम नाही,असे कामात असलेल्या पाहुण्यांना सांगतात.कुणी फार घाईत असतं.उभ्याने येतात आणि जातात.
वेळच मिळत नाही, असे तुम्ही रिकामटेकडे आहात अशा आविर्भावात म्हणतात.
काही खुप कंजूस असतात.पाहुणा आला की त्यांच्या पोटात गोळा उठतो.त्याच्या चहापान आणि जेवण याचा हिशोब तो लावतो.
त्याने साधा चहा पाजला नाही.आम्ही त्यांचे
थोबाड पाहत नाही.आमच्यासमोर त्यांची काय औकात वगैरे पाहुणे मंडळीत सुरू असते.असो चालायचं!
नारायण खराद अंबड
