चिंतनिय चिंता
माझा एक मित्र कायम चिंतातूर असतो.त्याने आयुष्यात चिंतेशिवाय काहीच केले नाही, पुन्हा काही न केल्याची चिंता करतो.त्याचे चिंतन देखील चिंतेभोवती फिरते.त्याच्या या चिंतातूर स्वभावाने ,सर्व चिंतेत आहे. चिंतेचे इतके विषय असतांना लोक आनंदी कसे रहातात याची देखील तो चिंता करतो.
तो कुणाचीही चिंता दूर करत नाही उलट चिंता वाढवतो.सुखी लोक बघून तो म्हणतो,
"अज्ञानी आहेत बिचारे."
जन्माला आलेल्या बालकांची तो चिंता करतो.
"कशी वाढ होणार यांची!" असे बोलतो.
तरुणांना बघून ,"अरे नोकरी नाही, लग्न नाही!"
म्हातारी माणसे दिसली की,"अरेरे ,किती हे हाल ." असे बोलून चिंता वाढवतो.
त्याने चिंतातूर लोकांची संघटना स्थापन करायचे ठरवले आहे.आज जगाला चिंता करणाऱ्या लोकांची गरज आहे, असे त्याचे ठाम मत आहे. जगात वाढलेली चिंता ही चिंता न केल्याचा परिणाम आहे. हा वैश्विक विचारही तो
मांडतो.
लोकांच्या वाढलेल्या पोटांची त्यास चिंता आहे, तशी ज्यांचे पोट भरत नाही त्यांचीही तो चिंता करतो
नापास झालेल्या मुलांची तो चिंता करतो तशी पास झालेल्यांचीही.
निपुत्रिकांची त्यास चिंता तशी मुलांबाळावाल्यांचीही तो काळजी अथवा चिंता करतो.त्यास मरणाऱ्या लोकांची चिंता आहे आणि जन्माला येणाऱ्याचीही तो चिंता
करतो.अविवाहितांचे लग्न कधी होणार याची
तो चिंता करतो तसे विवाहितांची आता काय
गत होणार याचीही तो चिंता करतो.
हिवाळ्यात, पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात त्याची चिंता वेगळीच असते.
त्यास विक्रेत्यांची चिंता आहे, ग्राहकांचीही आहे. दूधाचे भाव वाढले की तो ग्राहकांची चिंता करतो ,कमी झाले की विक्रेत्यांची!
सुंदर स्रियांची त्यास चिंता आहे, म्हातारपणी
सौंदर्य असणार नाही, याची तो चिंता करतो.
कुरुप स्रियांना तर सरळ म्हणतो की ,तुम्हाला
बघून खुप चिंता वाटते.सहानुभूती समजून लोक त्याच्या बोलण्याकडे दूर्लक्ष करतात.
त्याच्या काल्पनिक चिंताही खुप असतात. असे झाले तर..तसे झाले तर..! या स्वरुपाच्या
असतात. भूतकाळातल्या चिंताही तो आठवतो.'मला खायला नव्हते' फार कठीण काळ होता वगैरे.
लग्नाला होणाऱ्या खर्चाची चिंता मुलीच्या बापापेक्षा यालाच जास्त होते."किती खर्च झाला असेल?" हिशोब लावतो.विवाहित मुलीची चिंता करतो'गेली बिचारी सासुच्या ताब्यात'.' वराविषयी देखील चिंता ,अविवाहित बरा होता,भोग आता दुःख, संसाराचे चटके सोसेल बिचारा!"
पत्रावळीवरचे उष्टे बघून त्यास अन्नधान्य तुडवडा जाणवेल,असे राष्ट्रीय प्रश्न भेडसावू
लागतात. फूकट खाणाऱ्या लोकांची त्यास
काळजी वाटते तशी विकत घेतलेला लोकांचीही. एकाच वेळी तो दोन्ही बाजुंची चिंता करतो.निर्धन लोकांइतकीच त्यास धनवानांची चिंता आहे. मेल्यावर यांच्या धनाचे काय होणार असा तो विचार करतो.
लोक उन्हात, पावसात,थंडीत असली की तो
चिंता करतो."किती त्रास होत असेल लोकांना."
नवी पुस्तके बघून हि कधीतरी जूनी होणार हा
विचार त्यास अस्वस्थ करतो तर जून्या पुस्तकांचे काय होणार याची तो काळजी वाहतो.काळे केस पांढरे होणार याची चिंता करतो,पांढरे आता कधीच काळे होणार नाही
याचीही चिंता करतो.
त्याच्या मते, या जगात चिंता करावी असेच
सर्वकाही आहे पण अज्ञानामुळे लोकांना ते
कळत नाही. आनंद,सुख हे फक्त मूर्खपणातच
मिळते.शहाणी माणसे आनंदी नसण्याचे हेच
कारण आहे." चिंतेच्या त्याच्या या चिंतनाने
मीही थोडावेळ चिंतेत पडलो.आता मात्र त्याविषयी चिंतन करत आहे.
ना.रा.खराद
