*गुणवान शिक्षकांना मातीत लोटून त्यावर स्वत:चीच थडगी बांधणार्या महान व्यवस्थेची कर्मकहाणी*
काल एक शिक्षक भेटले. त्यांचा मुलगा एका नामवंत खाजगी ट्यूशन क्लासेमधून जेईई ची तयारी करत आहे. ते म्हणत होते, "कोट्टा, बायजू, अँलेन, वेदांतू, आयकँड सतराशे साठ क्लासेस झालेत. लूट आहे नुसती लूट. एका एका कोर्सची लाखानं फी भरावी लागते. फार बेकार परिस्थिती झाली आहे."
ते स्वत: एक शिक्षक आहेत. शिक्षणक्षेत्रात काही अर्थ उरलेला नाही असं त्यांना वाटतं. जर शिक्षकी पेशातल्या माणसालाच शिक्षणक्षेत्रात काही अर्थ वाटत नसेल तर सामान्य माणसांनी काय करावं? शिक्षणक्षेत्राबद्दल ही हताशेची भावना जन-सामान्यांमध्ये का आणि कशी निर्माण झाली? डाँक्टरी आणि शिक्षकी पेशाला नोबल प्रोफेशन मानलं जायचं. मग हा उतरणीचा आलेख कधी आणि कसा सुरू झाला?
पूर्वी महाराष्ट्रात गावोगावी प्राथमिक शिक्षणासाठी जिल्हा परिषद मराठी शाळा आणि माध्यमिक शिक्षणासाठी रयतचं किंवा त्या-त्या भागातल्या नामवंत संस्थेचं एक हायस्कूल असायचं. दोन्ही शाळांमध्ये आवश्यक व्यावसायिक प्रशिक्षण घेतलेले शिक्षक नेमले जायचे. पुढे शिक्षण विकून दांडगा नफा कमावण्याची युक्ती धनदांडग्या राजकारण्यांच्या डोक्यात आली. शाळा-काँलेजे हातात असली की राजकारण आणि समाजकारण समांतर पद्धतीने चालवून मतपेट्या भरता येतात हे धुरिणांच्या डोक्यात आलं. कारखाने उभे करून आर्थिक सत्ता निर्माण करण्याची उठाठेव करण्यापेक्षा शाळा बांधून खोर्यानं पैसा ओढणं त्यांच्यासाठी खूप सोपं होतं. मग शाळांचं वेगळेपण दाखवून पालकांना आकर्षित करण्यासाठी
इंग्रजी माध्यमांच्या शाळांचं फँड सुरू केलं गेलं. नंतर पालकांना दामदुपटीनं लुटायसाठी रहिवासी शाळांची निर्मिती करण्यात आली. घरातल्या सुरक्षित कौटुंबिक वातावरणातून खेचून मुलांना रहिवासी शाळांमध्ये टाकण्याचा फंडा सुरू झाला. या सगळ्या गोष्टींच्या बर्या-वाईटाचा पालकांनी कधीही विचार केला नाही. (पुढे सावकाश त्याची फळं भोगली आणि बिघडलेली मुलं वठणीवर आणण्यासाठी कौन्सिलरकडे जाऊन हजारो रूपये मोजले.)
इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या अक्षरश: बारावी पास, अर्धपदवीधर किंवा पदवीधरांना केवळ जुजबी इंग्रजी बोलता येतं एवढ्या पात्रतेवर इंग्रजी शाळांमधून शिक्षकांच्या नोकर्या दिल्या गेल्या. पालकांनी, शिक्षकांकडे शिक्षकी पेशासाठी आवश्यक व्यावसायिक प्रशिक्षण आहे की नाही याची चौकशी करण्याची कधीही जागरूकता दाखवली नाही. इंग्रजी बोलणारे शिक्षक या एकमेव आकर्षणापोटी आपापली पोरं इंग्रजी माध्यमात टाकली. पुढे जाऊन ना त्यांना उत्तम इंग्रजी बोलता आलं, ना दर्जेदार मराठी लिहिता-बोलता आलं. परक्या भाषेतून प्राथमिक शिक्षण घेताना सुमार दर्जाच्या शिक्षकांच्या तावडीत सापडून, कुठल्याही संकल्पना न कळल्यामुळे सलग काही पिढ्या गारद झाल्या. त्यातली अत्यंत बुद्धीमान मुलं यातूनही तरून गेली. सामान्य बुद्धिमत्तेच्या मुलांच्या हाताला फक्त धेडगुजरी हिंदीत बोलणं आणि पास क्लासच्या पदव्या लागल्या.
पुढे शिक्षणाचा धंदा अमर्याद फोफावल्यानंतर शिक्षकभरतीचा लिलाव सुरू झाला. 'जिसका दाम-उसीका काम' असा भरणा सुरू झाला. म्हणजे फक्त विद्यार्थ्यांकडून भरमसाट फिया लुटून शिक्षणमहर्षांच्या आसुरी भुका शमल्या नाहीत. मग अनुदानित शिक्षणसंस्थांच्या शिक्षकभरतीत गडबड-घोटाळे सुरू झाले. प्राथमिक- 5 लाख
माध्यमिक- 10 लाख
उच्च माध्यमिक- 10 ते 12 लाख
महाविद्यालयीन- 20 ते 40 लाख
असा रेटबोर्ड लागला. 'जिसकी लाठी उसकी भैस' या न्यायाने शिक्षकांची निवड होऊ लागली. सासुरवाडीची किंवा बापजाद्यांची वावर विकून शिक्षणमहर्षींच्या पोतड्या भरल्या गेल्या. काही धूर्त संस्थाचालकांनी आपल्या व आपल्या नात्यातल्या मुलींशी लग्न करण्याच्या अटीवर पदे भरली. एक ना अनेक मार्गांनी भ्रष्टाचार पसरत गेला. शुद्धलेखन आणि व्याकरणाचा गंध नसलेले भाषाशिक्षक आणि सुक्ष्मदर्शी न हाताळता येणारे विद्न्यानशिक्षकाच्या हाताखाली विद्यार्थी तयार(?) होऊ लागले. वर्षभरात एकदाही प्रयोगशाळेचं तोंड न पाहता प्रँक्टिकलला पैकीच्या पैकी गुणांची खैरात वाटली जाऊ लागली. शिक्षक मामा आणि विद्यार्थी भाचे एकत्रच बिड्या फुकू लागले. खाजगी शिक्षणसंस्थांनी गुणवंत, मेहनती शिक्षकांना देशोधडीला लावून नालायक शिक्षकांची मुजोर आणि माजोरडी फळी उभी केली. सरकारी शाळा ओस पाडल्या. द्न्यानमंदिराच्या हागणदार्या झाल्या.
*या सगळ्या अनाचारात अत्यंत मेहनतीने शिक्षण घेतलेली, उच्च श्रेणीत उत्तीर्ण झालेली अत्यंत कुशल आणि प्रामाणिक शिक्षकांची एक फळी पैसा अथवा वशिला नसल्यामुळे शिक्षणक्षेत्राच्या बाहेर फेकली गेली.* त्यांनी आपल्या द्न्यान आणि मेहनतीच्या बळावर आपापले खाजगी शिकवणी वर्ग उभे केले आणि नावारूपाला आणले. मग शाळेत शिक्षण न मिळाल्यामुळे गरजू विद्यार्थी आणि पालकांची पावलं या खाजगी क्लासेसकडे वळू लागली. पुन्हा एकदा शिक्षणक्षेत्रात एक मोठी उलथा-पालथ झाली. गरजू विद्यार्थ्यांसाठी, खोर्यानं लुटणार्या नव्या समांतर शिक्षणसंस्था उभ्या राहिल्या. या संस्थांनी, खिशात पैसा आणि वशिला नसल्यामुळे, बेरोजगारीच्या खाईत लोटल्या गेलेल्या तमाम उच्चविद्याविभूषित शिक्षकांना आपल्या जाळ्यात ओढून आपापले बडे-बडे होर्डिंग्ज उभारले. हाय-फाय-वाय-फाय सुविधायुक्त इमारती उभ्या केल्या. खाजगी शिकवणी वर्ग या गोंडस नावाने, करोडोंची कमाई करणार्या नव्या शिक्षणसंस्था पालकांना लुटायला उभ्या ठाकल्या.
वर्गात खर्रा खाऊन सट्टा खेळणार्या मास्तरांनी सरकारी शाळा बदनाम केल्या. पिढ्या बरबाद केल्या. देश पन्नास वर्षांनी मागे आणला. जिवतोड शिकवणारे पात्रतावान शिक्षक आपल्या कौशल्याच्या बळावर समांतर संस्थांमध्ये गेले. या सगळ्यात सामान्य पालक आणि विद्यार्थी भरडले गेले. गुणवान विद्यार्थी दर्जेदार शिक्षणापासून वंचित राहिले, वाया गेले. पालकांचा कष्टाचा पैसा नासला गेला. या भ्रष्ट व्यवस्थेत राहणे नको म्हणून विद्वान विद्यार्थी परदेशी निघून गेले आणि तिकडेच स्थायिक झाले.
हे सगळं घडत असताना विचारवंत तोंडाला कुलूप लावून तमाशा बघत बसले.
*ही स्थित्यंतरे घडत असताना खाली मान घालून बसलेले शिक्षणक्षेत्रातले भीष्म महर्षी आता द्रौपदी नागडी फिरत आहे म्हणून उर बडवायचा कांगावा करताहेत. आपण तरी कोणत्या तोंडाने खाजगी संस्थांच्या भरमसाठ फीबद्दल बोलू शकतो?*
साभार...
