बायकोची आंदोलने
लग्नाला हिंदीमध्ये गठबंधन म्हणतात. सरकार आणि संसार सारखाच असतो.दोन घटक पक्षांचा हा संसार
हा कसाबसा टिकवायचा असतो.एकमेकांना गोंजारत,कधी धमक्या देत तो सावरायचा असतो.ताणायचा असतो पण तुटू द्यायचा नसतो.
राज्याप्रमाणे घरात देखील बायकोची विविध
आंदोलने सुरू असतात. एकहाती सत्ता नसल्याने नवरोबास नमते घ्यावे लागते. पाठिंबा काढला की संसार कोसळण्याची शक्यता असते. सततच्या कुरबुरीला तोंड देत हा गाडा पुढे रेटायचा असतो.
आंदोलनाचे सगळे प्रकार बायकांना अवगत
असतात.
' मुकमोर्चा 'हा सर्वात परिणामकारकअसतो.हे आंदोलन वरवर अहिंसक वाटत असले तरी नवरोबा नावाच्या प्राण्याला नामोहरम करुन सोडते.आखिल नवरे या आंदोलनापुढे नतमस्तक होऊन जातात.
आपल्या मागण्या काय आहेत,हे न सांगता नवरोबास नुसते छळण्यासाठी हे आंदोलन उपयुक्त आहे.नवऱ्याच्या
कुठल्याही प्रश्नाचे उत्तर देणे यामध्ये टाळावे लागते. "तु गप्प का आहेस ?" या प्रश्नाचे देखील उत्तर देणे टाळले की हे आंदोलन यशस्वी होते.शहाण्याला मुक्याचा मार ही नवीन म्हण निर्माण होऊ शकते.
अनेकवेळा 'एकदिवसीय उपोषण 'असते. नवरोबास तो इशारा असतो.आंदोलन जास्त चिघळू नये म्हणून नवरोबा विनाअट बोलणीस तयार होतो.
'लाक्षणिक संप 'हा केवळ चेहऱ्यावरच्या हावभावाने प्रकट करावयाचा असतो.आजारीनसतांना तसे सोंग यामध्ये करावे लागते.नवरोबास मेटाकुटीला आणण्यासाठी हे आंदोलन परिणामकारक आहे.
'बहिष्कार 'हा आंदोलनाचा घरगुती प्रकार आहे. नवरोबाने आणलेल्या वस्तूंचा बहिष्कार करणे.त्याने आणलेला खाऊ न खाणे. हे आंदोलन जास्त काळ टिकत नाही. ठराविक वेळेपुरते ते ताणता येते.
'अन्नत्याग,'हे आंदोलन अघोरी असते. नवरोबा आपल्याला सोडून जेवतो का हे बघण्यासाठी असते. त्याच्या विनवणीला भिक घालायचे नाही,तेव्हा ते यशस्वी होते. नवरोबास क्लेश देणे हा या आंदोलनाचा हेतू असतो.
रास्ता रोको,हे आंदोलन अधुनमधून उरकावे
लागते.नवरोबास आपल्या आवडीच्या ठिकाणी न जाऊ देणे ,आवडीच्या व्यक्तीलान भेटू देणे यासाठी त्याचा रस्ता आडवणे .
'आत्मदाह इशारा, 'हे आंदोलन उग्र स्वरूपाचे
असते. आपली गरज आहे की नाही याची
चाचपणी याद्वारे केली जाते.किचन रुम बाथरूम यामध्ये कोंडून घेणे अशा स्वरूपात ते धमकावे लागते.कधीतरी 'थाळीनाद 'हे आंदोलन असते. घरातील भांडी
त्यासाठी उपयोगी पडतात. आदळआपट करणे यासाठी आवश्यक असते. घरभर किंवाशेजारच्या घरात आवाज जाईल इतका भांड्याचा नाद घुमला पाहिजे. भांडी भांडणामध्ये उपयोगी पडतात.
'आमरण उपोषण', हा प्रकार फक्त धमकावण्यापुरता असतो.सांयकाळपर्यंत त्याचा जोर ओसरतो.
जगण्याची आवड असल्याविना आमरणाच्या
धमक्या कुणी देत नसते.
बायकोच्या विविध आंदोलनाने भरलेला संसार ,सरकार सारखाच तारेवरची कसरत असतो.ज्यास तो टिकवायचा तो ही आंदोलने लिलया हाताळतो.
.ना.रा.खराद,पैठण
