*... तर मग, असे करावे अन असे करु नये*
सतत वीजपुरवठा खंडीत होतो, मग घरात 'इंव्हर्टर' बसवून घ्यावे; नळाला पाणी येत नाही, मग 'टॅंकर' बोलवावे किंवा 'बोअरवेल' घ्यावी; सार्वजनिक बसेस नाहीत किंवा कमी आहेत, मग स्वतंत्र गाडी घ्यावी; रस्ते खराब आहेत, मग पर्यायी रस्ते वापरावेत किंवा वर्गणी करुन आपणच ते दुरुस्त करुन घ्यावेत आणि मोठ्या रस्त्यांसाठी 'टोल' भरण्याची तयारी ठेवावी; तब्यत बिघडली अन सरकारी दवाखान्यात ईलाज होत नाही, मग खाजगी दवाखाने गाटावेत, ते सांगतील त्या तपासण्या कराव्यात, मागतील तेवढे पैसे द्यावेत; महागाई, बेरोजगारी, उच्च शिक्षणाचा वाढता खर्च, शेतकऱ्यांबद्दलची अनास्था या सगळ्या समस्या गपगुमान सोसाव्यात किंवा मग सोसने शक्य नसेल तर तितक्याच गपगुमानपणे आत्महत्या करावी.
लोकप्रतिनिधींना अशा क्षुल्लक कारणांसाठी अजिबात त्रास देवू नये. त्यांना मंदिर, मस्जिद, भोंगे, सोंगे, एकमेकांच्या टिंगलटवाळ्या, एकमेकांवर चिखलफेक करणे, दर चार महिन्याला लागणाऱ्या कुठल्यानकुठल्या निवडणूकांची 'स्ट्रॅटेजी' तयार करणे, निवडणूका लढणे, जिंकणे, विजयीसभा भरवणे, मिरवणूका काढणे, त्यांच्या व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या वाढदिवसाला 'बॅनरबाजी' करणे, तथाकथित विकासकामांचे 'इव्हेंट्स' साजरे करणे या अन अशा महत्वाच्या कामासाठी वेळ पुरत नसताना आपण त्यांचा अमूल्य वेळ वीज, पाणी, रस्ते, शिक्षण, महागाई, बेरोजगारी, शेतीप्रश्न अशा फाल्तू गोष्टींवर प्रश्न विचारुन वाया घालवू नये. नेत्यांशी कायम आदराने वागावे, त्यांची इज्जत करावी, त्यांना साहेब, दादा, भैय्या, काका, तात्या, बापू वगैरे वगैरे आदरार्थी शब्दांनी संबोधावे. नेत्यांनी केलेल्या चूका उघड करु नयेत. नेत्यांनी लाख चूका केल्या तरी त्या चुकांचा जाहीर उल्लेख टाळावा. आपण आपले बघावे, त्यांना त्यांचे बघू द्यावे. उगाच कुणाच्या फाटक्यात पाय कोंबू नये. नेते मोठे असतात, अनेक मोठ्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर असतात अन म्हणूनच त्यांच्या लहानसहान चूका विसरुन जायच्या असतात. सामान्य माणसे हीन असतात, कामचुकार असतात, आळशी असतात. सामान्य माणसांनी सामाजिक, राजकीय जीवनात हस्तक्षेप करायचाच नसतो. आपलेआपले बघायचे असते. सामाजिक, राजकीय जीवनात काय करावे, कसे करावे अन काय करु नये हे ठरवण्याचा ठेका नेत्यांनी घेतलेला असताना सामान्य माणसांनी त्यांचे डोके असल्या गोष्टीत खुपसून उगीच दिडशहाणपणा करु नये, आपली अक्कल पाजळू नये. नेत्यांवर सगळी जिम्मेदारी सोडून निवांत रहावे. ते करतील ते योग्य, न करतील तेही योग्य अशा समजूतदारीने वागावे. बारीकसारीक कारणावरुन उगीच बोंबाबोंब करु नये. जीवन जगताना त्रास होतच असतात ते सहन करीत जीवन कंठावे. एखाद्या सामान्य माणसाला सामाजिक जीवनात हस्तक्षेप करण्याची खाज सुटलीच तर त्याने दानधर्म करावे, गोरगरीबांना मदत करावी, सगळ्यांशी अदबीने वागावे, सामाजिक प्रश्नांवर बोलावे पण जरा सांभाळूनच बोलावे, उलटसुलट प्रश्न करु नयेत, सगळ्यांशी गोडीगुलाबी ठेवावी, आक्रमक होवू नये, चुका तर चुकूनही करु नयेत कारण त्यांच्या 'चुकांना माफी नसते'. आपले काम भले अन आपण भले असे रहावे. करता आलेच तर कौतुक करावे, टीका वगैरे करण्याच्या भानगडीत पडू नये. असे केल्यास असभ्यता, प्रसिद्धीखोरपणा वगैरे दिसून येतो. बोललेच तर देशातल्या, परदेशातल्या मोठ्ठ्या विषयांवर बोलावे. वीज, पाणी, रस्ते, महागाई, शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी असल्या चिल्लर अन रोजच्याच प्रश्नांवर बोलून अन या सगळ्याला लोकप्रतिनिधींशी जोडून बोलू नये.
लेखकांनी लिहावे, जरुर लिहावे. पान, फूल, पक्षी, प्राणी, निसर्ग, मित्र, आई, वडील, बायको, भाउ, बहिण, मुलगा, मुलगी, डोंगर, दऱ्या, नद्या, खोरे, इतिहासातील प्रेरक कथा, रम्य स्थळे अशा विषयांवर लिहावे. सामाजिक समस्यांवरही लिहावे. लिहून रडावे. शेतकरी, त्यांच्या आत्महत्या, कष्टकरी, त्यांच्या वेदना याबद्दल भरपूर लिहावे. वाचणाऱ्याच्या डोळ्यात पाणी येईल एवढे लिहावे. पण 'जनरलाईज' करुन लिहावे. अमूक एका समस्येला अमूक नेता जबाबदार असे थेट लिहू नये. असे लिहिणे म्हणजे असभ्यता असते. अशा असभ्य लेखक अथवा सामाजिक कार्यकर्त्यांना बंदूकीच्या गोळ्यांचा प्रसाद मिळतो किंवा ज्यांच्याबद्दल लिहिले आहे ते थोडे सज्जन असतील तर शिव्यांच्या लाखोल्या, थोबाडीत चापटा, लाथा-बुक्या मिळतात. म्हणून लेकरं-बाळं असलेल्या चांगल्या घरातल्या माणसांनी लिहून किंवा सामाजिक क्षेत्रात उतरुन, बंड पुकारुन फजिती करुन घेवू नये. अशा लोकांनी मुबलक पैसा कमवावा, शहरात जावे, जमले तर परदेशात जावे, आपल्या लेकरा-बाळांना शिकवावे, त्यांना नोकऱ्या करायला लावाव्यात, त्यांची लग्ने लावावीत, लेकरा-बाळांसह सहलीला जावे, सहकुटुंब आनंदी क्षणांचे फोटो सोशल मिडियावर टाकावेत, त्याला भरपूर लाईक्स अन कमेंट्स मिळाल्याच्या आनंदात न्हावून जावे.
सामान्य माणसाने सामजिक, राजकीय मान्यतेची महात्वाकांक्षा बाळगू नये. बाळगलीच तर प्रस्थापित पक्ष-संघटनांना, नेत्यांना जवळ करुन, त्यांच्याशी मिळते-जुळते घेवून, लाचार होण्याची मनाची तयारी ठेवून बाळगावी. उगीच स्वतंत्र काही करायला जावू नये. अशाने त्या मोठ्या नेत्यांचे लोक वाळीत टाकतात, बदनामी करतात, एकटे पाडतात. त्यामूळे समजदारीने मोठ्या नेत्यांशी मिळतेजुळते घ्यावे. 'गुडी गुडी' रहावे. आपली कितीही पात्रता असली तरी घराणेशाहीबद्दल काही बोलू नये. आज्याची, बापाची फळं पुढे नातवाला, पोराला मिळणारच. त्यामुळे पात्र असूनही घराणेशाहीमूळे नव्या पोरांची वर्णी लागत नसेल तर त्यात काही वावगे वाटून घेवू नये. अन लईच खूमकी असेल तर पात्रता सिद्ध करावी. त्यांच्याकडे शेकडो एकर जमीन, वर्षानुवर्षाची सत्ता असताना आपल्या सारख्या फाटक्यांची त्यांच्याशी थेट स्पर्धा लावणे हा अन्याय आहे असले रडगाणे घेवून बसू नये. एक तर घरदार, शेतीबाडी सगळ्यांची राखरांगोळी करुनही अपयश पचवायची तयारी ठेवावी किंवा उगी गप्प घराणेशाही, मोठ्यांच्या सत्तेचा स्विकार करावा.
अशाप्रकारे काहीही झाले तरी विद्रोही, बंडखोर वगैरे होवू नये. हे शब्द पुस्तकात, कवितेत, कादंबरीत शोभून दिसतात. प्रत्यक्ष जगण्यात ती फक्त जिभेवर उच्चारायची असतात. तसे मूळीच जगायचे नसते. आपली लोकशाही जगाच्या पाठीवरील सर्वात मोठी अन आदर्श लोकशाही आहे. इथे सभ्यतेने जगावे, सभ्य माणसासारखे मरावे. उगीच फुकटची लुडबूड करु नये. हां..., १५ ऑगस्ट अन २६ जानेवारीला मात्र सज्ज असावे. झेंडावंदन करावे. घरात, गाडीत, गाडीवर, शर्टावर सर्वत्र तिरंगी निशान लावावे आणि पूर्ण ताकतीने, आत्मविश्वासाने म्हणावे "स्वातंत्र्य दिन चिरायू होवो", "प्रजासत्ताक दिन चिरायू होवो", "भारत माता की जय", "वंदे मातरम"!
© ॲड. शीतल शामराव चव्हाण
(मो. 9921657346)
