आज,काल आणि उद्या
आपल्या जीवनाचा इतिहास, वर्तमान आणि भविष्य घडवितो तो काळ.काळाचा महिमा अपार आहे.कालचा आढावा घेत आजचे मार्गक्रमण करीत भविष्याचा वेध आपण घेत असतो.खरे म्हणजे काळ अचल असतो,आपण आणि आपले सारखे बदलते .आज नकळत काल होऊन जातो.जो कधीच गाठला जाऊ शकत नाही तो उद्या असतो.आपण आज उद्याचे ठरवतो.
जगलेले आयुष्य कालचे असते, उद्या तर केवळ भाकित असते आणि आज तर काहीच नसते.
आज ,काल आणि उद्या ह्याचा व्यावहारिक उपयोग होतो.परंतू आस्तित्व काळात विभागता येत नाही.काल तर हातातून निसटून गेलेला असतो,आज तर थांबत नसतो आणि उद्या तर आपण पकडू पहात असतो.
कालमध्ये अडकलेली माणसे आज गमावतात आणि तर
त्यांना ठावठिकाणा नसतो.
कुणी तीनही काळात वावरते तर कुणी कालमध्ये हरवलेले असते तर कुणी भविष्याकडे टक लावून बसलेले असते.
आज हा काल उद्या होता तर उद्या तो काल होणार असतो.काळाच्या पोटात तिन्ही काळ असतात.जो आपल्यासाठी आज असतो तो इतर कुणासाठी काल अथवा उद्या असतो.काळ प्रत्येकाचा वेगळा असतो.जन्मासोबत आपला काळ सुरू होतो.तो जन्मानंतरही कायम असतो.काळ फक्त साक्षीदार असतो.
आपली बहुतेक आश्वासने उद्याची असतात.उद्या हा आशावाद आहे,जो जगण्याची उमेद देतो.कालची खंत असते.आज नेहमी सारखाच हुलकावणी देतो.
मन तिन्ही काळात रमलेले असते.भूतकाळाच्या आठवणी
काढत,वर्तमानाशी झुंजत , भविष्याकडे वाटचाल सुरू असते.आपण उद्याची तयारी करतो.आज तर आपण उद्यासाठी जगतो.येणारा दिवस आपल्यासाठी नवी स्वप्न
घेऊन येतो.जीवन हे स्वप्न आहे, तसे स्वप्न हे देखील जीवन आहे.
जगलेले आयुष्य आणि जगायचे आयुष्य यामध्ये जगत
असलेले आयुष्य कुठे सापडत नाही.आयुष्य क्षणाक्षणाला असते,ते क्षणिक असते,त्याची विभागणी करता येत नाही.
अंधार होतो म्हणून ,तारीख बदलते म्हणून काळ दुभंगत नाही,तो अभंग आहे.
- ना.रा.खराद
