१५ जून
• राष्ट्रगीत, राज्यगीत, प्रतिज्ञा, संविधान, प्रार्थना, समूहगीत, स्वागतगीत, देशभक्तिपर गीत
• दिनांक : १५ जून २०... वार :
• सुविचार : अडचणी म्हणजे येणाऱ्या यशासाठी तयारी करण्याची जणू संधीच असते.
• म्हण : अगं अगं म्हशी , मला कुठे नेशी ?
- स्वतःला हवी असलेली गोष्ट, ती दुसऱ्याच्या आग्रहा मुळे करावी लागली असे दाखविणे.
• वाक्प्रचार : अकलेचे तारे तोडणे - अविचाराने बडबड करणे
• पाढा : १५ ३० ४५ ६० ७५ ९० १०५ १२० १३५ १५०
इंग्रजी शब्द :
१. a (अ) - उपपद / एक
२. I (आय) - मी / प्रथम पुरुष एकवचनी सर्वनाम
३. am (ॲम) - आहे
४. an (अन) - उपपद
५. as ( ॲज ) - च्या सारखा / म्हणून / जसा / जरी
६. at ( ॲट ) - येथे / कडे / ला / ने
विचारधन :
जो स्वतःसाठी जगतो तो मरतो, जो समाजासाठी मरतो तोच जगतो. – अण्णा हजारे
दिनविशेष :
१) अमेरिकेतील बहुआयामी व्यक्तिमत्व, संशोधक बेंजामिन फ्रँकलिन यांनी आकाशात कडाडणारी वीज ही वीज (विद्युत) असल्याचे सिद्ध केले - १७५२
२) आ. स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेते, समाजवादी विचारवंत ना. ग. उर्फ नानासाहेब गोरे जन्मदिन - १९०७
३) भारतीय संगीतकार, मंडोलिनवादक (तंतुवाद्य) सज्जाद हुसेन यांचा जन्म - १९१७
४) हिंदी चित्रपट अभिनेत्री, गायिका सुरैय्या जमाल यांचा जन्म - १९२९
५) महाराष्ट्रातील समाजसेवक अण्णा हजारे यांचा जन्म - १९३७
६) भारतीय वंशाचे इंग्लंडचे पोलाद क्षेत्रातील उद्योगपती लक्ष्मीनिवास मित्तल यांचा जन्म - १९५०
७) चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा जन्म - १९५३
८) अमेरिकन जीवशास्त्रज्ञ वेंडेल स्टॅन्ले यांचे निधन - १९७१
व्यक्तिविशेष
महाराष्ट्रातील समाजसेवक अण्णा हजारे
महाराष्ट्रातील भारतीय समाजसेवक, कृषिशील, माजी सैनिक अण्णा हजारे (किसन बाबुराव हजारे) यांचा जन्म १५ जून १९३७ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील भिंगार या गावी झाला. पारनेर तालुक्यातील राळेगणसिद्धी हे त्यांचे मूळ गाव. तेथेच त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. सातवीपर्यंत शाळा अर्धवट सोडून त्यांनी मुंबई येथे फुलांचा व्यवसाय सुरू केला. पुढे १९६० ते १९७८ या दरम्यान भारतीय सैन्यात त्यांनी वाहनचालक म्हणून देशाची सेवा केली. चीन (१९६२), पाकिस्तान (१९६५) युद्धात त्यांनी आपले योगदान दिले.
निवृत्तीनंतर त्यांच्यावर स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, विनोबा भावे यांच्या विचारांचा प्रभाव पडला. देशसेवेच्या कार्यात त्यांनी स्वतःला वाहून घेतले.
सेवानिवृत्तीनंतर त्यांनी मागासलेल्या तसेच कायम दुष्काळी असलेल्या राळेगणसिद्धी या गावात तळबंदी, झुडपे हटवणे, वृक्षारोपण, पाणी अडवा – पाणी जिरवा, धान्य बँक यासह अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले.
त्यामुळे राळेगणसिद्धी हे समृद्ध व संपन्न खेडे बनले व एक आदर्श गाव म्हणून भारताच्या नकाशात चमकले. त्यानंतर अण्णांनी माहितीचा अधिकार, भ्रष्टाचारमुक्तीसाठी जनलोकपाल, इत्यादींसाठी अनेक कायदे तयार करण्यासाठी सक्रीय भाग घेतला. त्यासाठी त्यांनी अनेकवेळा उपोषणे केली.
“माझे गाव माझे तीर्थ, राळेगणसिद्धी – अ जोर्नी टु ट्रान्सफॉर्मेशन” यासह आत्मचरित्रात्मक पुस्तके त्यांनी लिहिली.
त्यांच्या कार्यामुळे त्यांना पद्मश्री (१९९०), पद्मभूषण (१९९२), इंदिरा गांधी वृक्षमित्र पुरस्कार (१९८६), कृषिभूषण (१९८९), जर्मनीचा इंडिगो अवॉर्ड (२००३), वर्ल्ड फेमस गिल मेमोरियल अवॉर्ड (२००८), इंडिया इंटिग्रिटी अवॉर्ड (२०१३) यासह अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. तसेच २००४ साली त्यांना गांधीग्राम ग्रामीण विद्यापीठाची मानद डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली आहे.
